ग्रंथ महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रंथ महोत्सव
ग्रंथ महोत्सव

ग्रंथ महोत्सव

sakal_logo
By

फोटो-

अडीच कोटी रुपयांची पुस्तके
शाळांच्या ग्रंथालयांना देणार
---
पालकमंत्री केसरकर; जिल्हा ग्रंथोत्सवास सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : वाचन संस्कृती रुजविण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवून वाचन चळवळीला गती देईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. जिल्ह्यात नावीन्यपूर्ण योजनेतून सुमारे अडीच कोटी रुपयांची पुस्तके शाळांच्या ग्रंथालयांना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा ग्रंथोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी उपस्थितांशी ऑनलाइन संवाद साधला. ज्येष्ठ कादंबरीकार दि. बा. पाटील प्रमुख पाहुणे होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, सकाळी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक किरण गुरव यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन केले आहे. ते उद्या (ता. १०)पर्यंत खुले असेल.
श्री. केसरकर म्हणाले, की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मराठी भाषेचे कार्य अधिक जोमाने होण्यासाठीही नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. ग्रंथवाचनाची आवड निर्माण होण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शाळांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. राज्यात पुस्तकांची गावे तयार करण्यासह प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सवाप्रमाणे कार्यक्रम राबविले जातील.
श्री. पाटील म्हणाले, की समाजाला सुसंस्कृत चेहरा देण्याचे काम ग्रंथ करतात. व्यक्तीला शिक्षित आणि सुसंस्कृत घडविण्याचे काम साहित्य करते. याचसाठी राज्यातील साहित्यिकांनी वाचनसंस्कृतीला बळ देण्याचे काम करावे. समाजात वाढत चाललेली विकृती, मोबाईलचा होणारा गैरवापर हे चित्र बदलण्याचे काम ग्रंथच करू शकतात.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, की ज्ञानाचा सर्वांत चांगला स्रोत म्हणजे पुस्तके, ग्रंथ आहेत. ग्रंथांचा वापर हा केवळ कपाटात ठेवण्यासाठी न करता त्याचे नियमित वाचन करून अधिकाधिक ज्ञान ग्रहण करावे. जीवनात येणाऱ्या संकटाच्या काळात अचूक निर्णय घेण्याचे ज्ञान आपल्याला पुस्तके देतात.
या वेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी सुहास गाडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तानाजी मगदूम, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह विनोद कांबळे, कवी विसूभाऊ बापट उपस्थित होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी प्रास्ताविक केले. आनंद शिंदे यांनी आभार मानले.
....

ग्रंथालयांना अनुदान वाढीसाठी प्रयत्न
पालकमंत्री केसरकर म्हणाले, की शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदानवाढ, गाव तिथे ग्रंथालय योजनेंतर्गत ज्या गावांमध्ये सार्वजनिक ग्रंथालये नाहीत, त्या गावांत ग्रंथालयांना नवीन मान्यता देण्याबाबत आणि दर्जावाढीबाबत शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.