इचल : कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत
इचल : कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत

इचल : कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

वृद्ध कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत

दोन वर्षांपासून वंचित; उदरनिर्वाहात अडचणी

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी,ता. ९ : कोरोनाची दाहकता आजही लोककलाकार सहन करीत आहेत. जिल्ह्यातील १०० हून अधिक लोककलाकार, साहित्यकांचे केंद्राकडून मिळणारे मानधन थकले आहे. याबाबत कलाकारांनी पंतप्रधान मोदीपासून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, खासदारांकडे अनेकवेळा मानधन सुरू करण्याची विनंती केली. मात्र काहीच कार्यवाही होत नसल्याने दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न कलाकार उपस्थित करीत आहेत.
केंद्र शासन व राज्य शासनाकडून कीर्तनकार, गोंधळी, तमाशा, साहित्यिक, गायक, वादक, कवी, नाट्य, चित्रपट, वादक, लेखक आदींसाठी वृद्धापकाळात त्यांची फरपट होऊ नये यासाठी मानधन योजना सुरू केली आहे. केंद्राकडून ४ हजार तर राज्य शासनाकडून श्रेणीनुसार १५०० ते ३ हजारपर्यन्त मानधन मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० जूनपासून अनेक लोककलाकार मानधनापासून वंचित आहेत. परिणामी त्यांना उदरनिर्वाहासाठी कसरत करावी लागत आहे.
माहिती व प्रसारण केंद्राकडील निधी कमी केल्याने दूरदर्शनवर लोककलाकारांना संधी मिळणे दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे दूरदर्शन केंद्राच्या परिसरातील कालाकारांचे कार्यक्रम देणे, रेकॉर्डींग करणे बंद झाले आहे. केंद्राने कलाकारांचे थकीत मानधन सुरू करून वृद्धापकाळ सुखद करण्याची आवश्यकता आहे.
------------------------------
हे योजनेस पात्र...
साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी १५ ते २० वर्षे काम केले आहे. ज्याचे वय ५० वर्षापेक्षा जास्त आहे. अर्धांगवायू, क्षय, कर्करोग, कुष्ठरोग रोगांनी आजारी आहेत. अपघाताने किंवा अन्य कारणाने ४० टक्क्यांहून अधिक शारीरिक व्यंग आले आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ४८ हजारपेक्षा कमी आहे ते कलाकार योजनेस पात्र राहतात.
-----------
कोट
केंद्राने मंजूर केलेल्या मान्यताप्राप्त वृध्द कलाकारांना औषधोपचारासाठी मानधन मिळत होते. दुर्देवाने जून २०२० पासून एक रूपयाही मिळालेला नाही. ज्यांनी आयुष्यभर कलेसाठी योगदान दिले त्यांची सरकारकडून ससेहोलपट व्हावी ही दुर्देवी बाब आहे.
- शाहीर विजय जगताप