एसटी प्रवास सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी प्रवास सुरू
एसटी प्रवास सुरू

एसटी प्रवास सुरू

sakal_logo
By

कर्नाटक सीमाभागात एसटीचा प्रवास सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. ९ ः गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाल्याने स्थानिक पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाने कर्नाटकात जाणाऱ्या बस अंशतः रद्द केल्या होत्या. आज पोलिसांच्या सूचनेनुसार दोन्ही राज्यांतील एसटींचा प्रवास पुन्हा सुरू झाला. त्यानुसार कोल्हापुरातूनही एसटी गाड्यांनी सीमा भागात सुरक्षित प्रवासी वाहतुकीला सुरुवात केली.
गेल्या चार दिवसांत कोल्हापुरातील ५७२ फेऱ्यांपैकी ३१२ फेऱ्या पुढील सूचना येईपर्यंत अंशत: रद्द केल्या होत्या. त्यामुळे एसटीचा जवळपास रोजच्या पाच ते सात लाखांचा महसूल बुडाला होता. याशिवाय, हजारो प्रवाशांची गैरसोय झाली होती. राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड आदी जिल्ह्यांतून एसटीच्या बसचा प्रवास कर्नाटकात काही अंशी सुरू झाला आहे. यापैकी कोल्हापुरातून निपाणी- बेळगावमार्गे जाणाऱ्या बस सकाळी नऊपासून सुरू झाल्या. कोल्हापुरातून गडहिंग्लज, चंदगड, आजरामार्गे तळकोकण व गोव्याला जाणाऱ्या बसफेऱ्या निपाणी मार्गाने सुरू झाल्या आहेत. गरजेनुसार कर्नाटक पोलिस प्रशासनाकडून संबंधित बससाठी पोलिस संरक्षण घेतले जाईल. दरम्यान, कर्नाटक परिवहनच्या गाड्याही कोल्हापुरात येण्यास आज दुपारपासून सुरुवात झाली.
....
प्रवासी प्रतिसाद जेमतेम
गेले चार दिवस कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसचा प्रवास तूर्त रद्द झाला होता. तसेच, सीमाभागात तणावाचे वातावरण होते. याचा विचार करून कौटुंबिक प्रवासी वर्ग आज प्रवासाला फारसा निघाला नाही. त्यामुळे प्रवास सुरू झाला तरी गर्दी कमी होती. कोकणात व पणजीकडे जाणाऱ्या गाड्यांना मात्र प्रवासी प्रतिसाद होता.