
फुटबॉल
ब्राझीलचा स्वप्नभंग;
क्रोएशिया उपांत्य फेरीत
दोहा, ता. ९ ः ब्राझीलने फुटबॉलमधील पाचवे जगज्जेतेपद २० वर्षांपूर्वी पटकावले होते. त्यानंतर त्यांची प्रतीक्षा कायम राहिली. या वेळच्या विश्वकरंडकातही त्यांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. गतउपविजेत्या क्रोएशियाने पेनल्टी शूटआउटमधील वर्चस्व कायम राखताना जादा वेळेतील १-१ गोलबरोबरीनंतर पेनल्टी शूटआउटवर ४-२ अशी बाजी मारली. ब्राझीलसाठी मार्किन्होस ‘खलनायक’ ठरला; तर गोलरक्षक डॉमिनिक लिव्हाकोविच क्रोएशियाचा ‘नायक’ बनला.
स्पर्धेतील पहिला उपांत्यपूर्व सामना आज एज्युकेशन सिटी स्टेडियमवर झाला. क्रोएशियाने तिसऱ्यांदा विश्वकरंडक स्पर्धची उपांत्य फेरी गाठली. क्रोएशियाने २०१८ मध्ये बाद फेरीतील सलग तीन सामने पेनल्टी शूटआउटवर जिंकत अंतिम फेरी गाठली होती. यंदा राउंड ऑफ १६ फेरीत त्यांनी जपानला याचप्रकारे हरविले आणि आता ब्राझीलला स्पर्धेबाहेर काढले. ब्राझीलच्या रॉड्रिगो याचा पहिलाच फटका क्रोएशियाचा गोलरक्षक डॉमिनिक लिव्हाकोविच याने अडविला. नंतर चौथा फटका मार्किन्होस याने गोलपोस्टवर मारला आणि क्रोएशियाच्या खेळाडूंनी जल्लोष केला. त्यांच्या निकोला व्लासिच, लोव्हरो माएर, लुका मॉड्रिच, मिस्लाव ऑर्सिच यांनी अचूक नेम साधला. ब्राझीलच्या कासिमिरो व पेद्रो यांनीच अचूक फटके मारले. लिव्हाकोविच याने जपानविरुद्धही तीन पेनल्टी फटके अडविले होते.
सविस्तर वृत्त पान ७ वर
चौकट
छापता-छापता....
उपांत्यपूर्व फेरीची दुसरी लढत अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यात अतिशय चुरशीच्या स्थितीत आली होती. या सामन्यातील पहिला गोल मेस्सीच्या अफलातून पासवर साकारला गेला; तर उत्तरार्धात मिळालेल्या पेनल्टीचे मेस्सीने सोने केले. सामन्याच्या शेवटी-शेवटी सूर गवसलेल्या नेदरलँडने सामना २-२ असा बरोबरीत आणून ठेवला होता. ७९ व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या वॅघोस्टने दोन गोल केले. त्याने ८३ व्या मिनिटाला एका अफलातून हेडरवर पहिला गोल साकारला. सामन्यातील जादा वेळेच्या अगदी शेवटच्या क्षणी नेदरलँडला फ्रिक किक मिळाली आणि त्याचा फायदा उठवत वॅघोस्टने दुसरा गोल करीत सामना उत्कंठापूर्ण स्थितीत नेला.