सजग, साकल्याने विचार केला पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सजग, साकल्याने विचार केला पाहिजे
सजग, साकल्याने विचार केला पाहिजे

सजग, साकल्याने विचार केला पाहिजे

sakal_logo
By

सजग, साकल्याने विचार केला पाहिजे
प्रबोधिनीमधील ‘निवडणूक निकालांचा अन्वयार्थ’वरील चर्चासत्रात मत

इचलकरंजी, ता. ११ : निवडणुकीच्या निकालांचे सोयीनुसार अर्थ काढले तर ते तात्कालिक सोयीचे ठरत असतात, मात्र ते दीर्घकालीन दृष्ट्या परिणामकारक व उपयुक्त ठरत नाही. अंधभक्ती आणि अंधविरोध या पलीकडे जाऊन हा जनादेश समजून घेऊन त्याचा सजगपणे व साकल्याने विचार केला पाहिजे, असे मत समाजवादी प्रबोधिनीव्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त केले. ‘निवडणूक निकालांचा अन्वयार्थ’ या विषयावरील हे चर्चासत्र होते.
समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील आणि थोर गायिका लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना आदरांजली वाहण्यात आली. चर्चासत्रात गुजरातमध्ये भाजपला सलग सातवा ऐतिहासिक मोठा विजय मिळाला याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, मात्र त्याचबरोबर हिमाचल प्रदेश विधानसभा, दिल्ली महानगरपालिका, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, बिहार, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे, हेही वास्तव आहे. या जनादेशाचा भाजपने आणि त्याच्या विरोधकांनीही गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
दोन राज्यांतील विधानसभा, दिल्ली महापालिका आणि पाच राज्यांतील पोटनिवडणुकांच्या निकालावर चर्चा केली. ज्या गुजरात मॉडेलची चर्चा २०१४ मध्ये देशभर केली जात होती. त्याची चर्चा खुद्द गुजरातमध्येही या निवडणुकीत नव्हती, याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. अलीकडे राजकारणात सर्वांगीण विकासाचा प्रामाणिक मंत्र जपण्याऐवजी निवडणूक जिंकण्याचे प्रादेशिक, धार्मिक, सांस्कृतिक तंत्र विकसित झाले आहे. हे केवळ भारतातच घडत आहे, असे नाही तर जगभर घडताना दिसत आहे, असे सांगण्यात आले. चर्चेत प्रसाद कुलकर्णी, तुकाराम अपराध, पांडुरंग पिसे, महालिंग कोळेकर, देवदत्त कुंभार, मनोहर जोशी आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
-----------
जनतेला भेडसावणारे प्रश्न सोडवणे अपेक्षित
राजकारणात कोणीही अमरपट्टा घेऊन येत नाही. लोकशाहीत लोक ही सर्वात महत्त्वाची शक्ती आहे. सक्षम व विश्वासार्ह पर्याय दिला तर जनता तो स्वीकारत असते. राष्ट्रीय पक्ष धर्मवाद, व्यक्तीस्तोम व प्रादेशिक अस्मिता यावर आधारित राजकारण करत राहिले तरी ते फार काळ टिकत नाही. महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय आदी जनतेला भेडसावत असलेले प्रश्न सोडवणे अपेक्षित असते, असे मत व्यक्त केले.