
गडहिंग्लजला भाजीमंडई हाऊसफुल्ल
67916
गडहिंग्लज : येथील बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे.
गडहिंग्लजला भाजीमंडई हाउसफुल्ल
आवकेमुळे दर उतरले; मिरची, काकडी, दोडका मात्र तेजीत, फळांना मागणी टिकून
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : उसाच्या लावणीतील पालेभाज्या दाखल झाल्याने येथील भाजीमंडई हाऊसफुल्ल झाली आहे. खासकरून वांगी, टोमॅटो, बिन्स, कोबी यांची मागणीपेक्षा अधिक आवक असल्याने दर उतरलेलेच आहेत. तुलनेत हिरवी, मिरची, काकडी, दोडका यांचे दर तेजीत आहेत. मार्गशीष महिन्यामुळे फळांना मागणी कायम आहे.
परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने दोन महिन्यांपासून पालेभाज्या, फळभाज्या यांची आवक घटली होती. परिणामी, दर कडाडले होते. पण, आता आवक पूर्वतत झाल्याने दर उतरले आहेत. पंधरवड्यापासून कोबी, वांगी, टोमॅटो यांची सर्वाधिक आवक असल्याने दर घसरले आहेत. तुलनेत हिरवी मिरची, कोल्हापुरी काकडी दोडका यांचे दर तेजीत आहेत. पालेभाज्यांचे भाव कमी आहेत. कोंथिबीर दहा तर मेथी पाच रुपये पेंढी असा दर आहे. गाजरांची आवक अधिक आहे. दहा किलोचे दर असे कोबी ५०, प्लॉवर ८० रुपये डझन, भेंडी, कारली ३००, पेप्सा काकडी २००, कोल्हापुरी काकडी ५००, बिन्स २५०, वांगी १५० रुपये.
फळबाजारात गेल्या तीन आठवड्यांपासून उलाढाल वाढली आहे. नागपूर परिसरातील संत्र्याची आवक कायम आहे. सफरचंद, सीताफळ, पेरूची चांगली आवक असून, किलोचा दर ६०-८० रुपये आहे. चमेली आणि अॅपल बोरांची आवक भरपूर असून, ६० रुपये किलो दर आहे. सफरचंद १२० तर केळी ४० रुपये डझन आहेत.
---------------
चौकट
बटाटा वधारला
कांदा ५०० ते २००० रुपये क्विंटल आहे. किरकोळ बाजारात १० ते ३० रुपये किलो अशी विक्री सुरू होती. प्रत चांगली नसल्याने बटाट्याचे दर वधारले आहेत. इंदूर, आग्रा २६०० ते २८०० रुपये क्विंटल असून, किलोचा २० ते ४० रुपये असा दर आहे. लसणाचा दर स्थिर असून, २५ ते १०० रुपये किलो दर आहे.