
कचऱ्याचे ढिग
67883
शहराच्या प्रवेशद्वारावर कचरा कायम
महापालिका, ग्रामपंचायतींकडून ‘प्रदूषण’ची नोटीस बेदखल; आता कारवाई होणार
कोल्हापूर, ता. ११ ः शहरातील प्रवेशद्वारांवर टाकलेल्या कचऱ्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस बजावूनही महापालिका, तसेच पाच ग्रामपंचायतींनी काहीच दखल घेतलेली नाही. सात दिवसांत उत्तर दिलेले नसून, कचराही जैसे थे आहे. त्यामुळे मंडळाने पुढील कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली असून, वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे आता महापालिका व ग्रामपंचायतींवर कारवाई होणार आहे.
शहरात प्रवेशाचे मार्ग असलेल्या अनेक रस्त्यांवर काही महिन्यांपासून ढीग पडत आहेत. त्यांचा काही भाग महापालिकेच्या हद्दीत येतो, तर बहुतांश भाग ग्रामपंचायतींच्या हद्दीत येतो. कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संघटनेने तक्रार केल्या होत्या. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीत महापालिकेच्या हद्दीत कचरा टाकण्यासाठी परवानगी घेतलेली नाही तसेच कोणतीही खबरदारी न घेता व नियमांचा अवलंब न करता कचरा टाकल्याचे आढळले होते. याबाबत मोरेवाडी, बालिंगा, पाचगाव, नागदेववाडी, शिंगणापूर ग्रामपंचायतींना तसेच महापालिकेलाही २५ नोव्हेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते. पण, पंधरा दिवस काहीच झालेले नाही. त्यामुळे संघटनांनी विचारणा केल्यावर मंडळाने शुक्रवारी (ता.९) पाहणी केली. त्यात परिस्थिती ‘जैसे थे’ आढळली. कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने मंडळाने आता वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.
चौकट
टिपरच्या फेऱ्या वाढवण्याची गरज
शहरात अनेक रस्त्यांवरील कोंडाळे काढले आहेत. त्यानंतर त्या कोंडाळ्याच्या ठिकाणी कचरा पडलेला नाही. पण, त्याच रस्त्यावर पुढे-मागे कचरा दुतर्फा टाकला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कचरा टाकू नये म्हणून महापालिकेकडून केले जात असलेले प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहेत. कचरा उठाव करणारे टिपरच्या फेऱ्या कमी असल्याने संबंधित भागात फेऱ्या वाढवण्याची गरज आहे.