सासु विरोधात सुनबाई मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासु विरोधात सुनबाई मैदानात
सासु विरोधात सुनबाई मैदानात

सासु विरोधात सुनबाई मैदानात

sakal_logo
By

सासु विरोधात सुनबाई मैदानात
भादवणमध्ये प्रतिष्ठेची लढत; नेतेमंडळीची प्रतिष्ठापणाला
सुभाष पोवार ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १२ ः तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व लोकसंख्या अधिक असलेल्या भादवण ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होणार आहे. शिवसेना प्रणित युवा शक्ती विकास आघाडीविरोधात विविध पक्ष व राजकीय गटांची समविचार परिवर्तन आघाडी अशी थेट लढत होत आहे. सरपंचपदासाठी नात्याने एकमेकींच्या सासु व सुन असलेल्या जयश्री गजानन गाडे आणि माधुरी रणजीत गाडे यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीत दोन्हीकडील नेतेमंडळीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिवसेना प्रणित लोकनियुक्त सरपंच संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा शक्ती विकास आघाडी मैदानात आहे. त्यांच्याबरोबर शिवसेना उपशाखाप्रमुख संदिप सुतार, रणजित गाडे, माजी उपसरपंच दयानंद पाटील, संभाजी कांबळे, बाळासाहेब कुंभार, पी. के. केसरकर, मारुती देसाई, शिवाजी कुंभार कार्यरत आहेत. श्री. पाटील यांनी सरपंचपदाच्या काळात केलेल्या कामाच्या विश्वासावर ते मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस यांच्यासह समविचारी पक्ष संघटनांची समविचारी आघाडी लढत देत आहे.
गत निवडणुकीत संजय पाटील यांनी सरपंचपदासह सहा जागा जिंकल्या होत्या. पाच वर्षांत त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर रिंगणात उतरले आहेत. सत्तांतर करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येवून समविचारी आघाडी गठीत केली आहे. समविचारी आघाडीचे नेतृत्व संजय गाडे, बी. टी. जाधव, डॉ. गोपाळ केसरकर, पांडुरंग जोशीलकर, एम. टी. मुळीक, आनंदा देवकर, टी. बी. मुळीक, जयवंत पाटील, शामराव मुळीक करीत आहेत. या लढतीकडे तालुक्यासह कागल विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहीले आहे.
----------
सतेज पाटील, महाडिक एकाच फलकावर
भादवण (ता. आजरा) येथील समविचारी आघाडीच्या फलकावर माजी पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांचे फोटो शेजारी - शेजारी लावले आहेत. पाटील व महाडिक यांचे वैर राज्यभर जाहीर असताना त्यांचा भादवण येथील एका आघाडीसाठी फलकावर झालेला एकोपा सध्या तालुक्यात चर्चचा विषय बनला आहे.