नॉट रिचेबल अंतिवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॉट रिचेबल अंतिवडे
नॉट रिचेबल अंतिवडे

नॉट रिचेबल अंतिवडे

sakal_logo
By

६७९०५
....

अंतिवडे विकासापासून ‘नॉट रिचेबल’

आमदार, खासदारांची एकदाही भेट नाही; महावितरण, वन विभागाचेही दुर्लक्ष

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : जिल्ह्यातील अंतिवडे (ता. भुदरगड) हे असे गाव आहे, ज्या ठिकाणी वन विभाग सरपणासाठी वाळलेल्या झाडांच्या फांद्या तोडू देत नाही. गावातील खराब झालेले विजेचे खांब कधीही पडून अपघात होऊ शकतो. पण, महावितरण त्याठिकाणी लक्ष देत नाही. उन्हाळ्यात जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. एवढेच नव्हे, तर अचानक काही आपत्ती आली तर पै-पाहुण्यांना किंवा सरकारी यंत्रणेला मोबाईलवरून संपर्क साधावा म्हटले तर रेंज मिळत नाही. आमदार-खासदारांनी या गावाला कधी भेट दिल्याचे आठवत नाही. विधानसभा किंवा लोकसभेला मतदान मागायचे असेल तर गावातीलच एक-दोन कार्यकर्ते येतात आणि मतदान करा म्हणून सांगतात, असे हे गाव विकासापासून आणि मोबाईल रेंजपासून आणखी किती दिवस ‘नॉट रिचेबल’ राहणार, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.
गारगोटीपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. ४०० ते ४५० मतदार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता झाला. घनदाट जंगलातून जाताना किड्यांचा आणि पक्ष्यांच्या आवाजाव्यतिरिक्त कोणताही आवाज ऐकायला येत नाही. गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती कामानिमित्त मुंबईला असते. गावातील शिवलिंग मंदिराजवळ काही ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत बसलेले असतात. डोंगराच्या पायथ्यालाच असणाऱ्या या गावात ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असली, तरीही गावात एकही प्रचाराचा फलक नाही किंवा प्रचार पत्रकही काढलेले नाही. गावांनी कोणाला विजयी करायचे आहे, हे जाहीरपणे ठरविले आहे. त्यांनाच ते मतदान करणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीला मतदान करणे ही आमची सोय असल्याचे सांगतात. पण, गेल्या अनेक वर्षांत आमदार किंवा खासदाराने या गावाला भेट देऊन येथील अडीअडचणी जाणून घेण्याचे काम केलेले नाही. वन विभागाने जंगलातील वृक्षांच्या फांद्या तोडू नका, असे सांगून त्या बदल्यात गॅस देण्याचे कबूल केले होते. अनेक वर्षांपासून त्या अधिकारी आणि गॅसचाही पत्ता नाही. रस्त्यावरील विजेचे खांब आहेत. ते गंजले आहेत. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे हे खांब कधीही कोसळू शकतात. वेळेत वीजबिले भरूनही खांब बदलण्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोबाईलला रेंज यावी, यासाठी ‘बीएसएनएल’ची तरंग यंत्रणा आहे. मात्र, ही यंत्रणा आता कुचकामी ठरत आहे. एखाद्याला मोबाईलवरून बोलायचे असेल तर जंगलातीलच एखाद्या झाडावर चढून रेंजची वाट पाहावी लागते. अशा या भयाण वातावरणात राहणाऱ्या लोकांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी आमदार, खासदार किंवा सरकारी अधिकारी आमच्या गावाला येतील का, असा सवाल ग्रामस्थांकडून होत आहे.
...

वाहन भाड्यासाठी ५०० रुपये
ऑनलाईन द्या, मगच येतो
गावात एखादी सरकारी यंत्रणा बंद पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले तर तो गाडी भाड्यासाठी ५०० रुपयांची मागणी करतो. हे पैसे गावात आल्यावर नाही, तर ऑनलाइन दिले तरच येणार म्हणून सांगतात. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, हाच मोठा प्रश्‍न आहे.

...

‘सकाळ’ने विचारपूस केली याचे समाधान
जंगलातून वाट काढत यावी लागते. आडवळणात असणाऱ्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक कशी आहे, हे पाहायला आणि आमचे दु:ख समजून घ्यायला कोणी आमदार-खासदार आले नाहीत. पण, ‘सकाळ’ने येऊन आमचे दु:ख हलके करण्याचे काम केल्याबद्दल समाधान वाटले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
.....