आरोग्य उपकेंद्रांना मुहूर्त कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य उपकेंद्रांना मुहूर्त कधी?
आरोग्य उपकेंद्रांना मुहूर्त कधी?

आरोग्य उपकेंद्रांना मुहूर्त कधी?

sakal_logo
By

आरोग्य उपकेंद्रांची प्रतीक्षा संपेना
अद्याप भरती प्रक्रिया सुरूच; शहरात बारा ठिकाणी जागा निश्‍चिती
कोल्हापूर, ता. १२ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून शहरासाठी मंजूर असलेल्या १२ उपकेंद्रांना मुहूर्त अद्याप मिळालेला नाही. शोधाशोध केल्यानंतर महापालिकेने चार महिन्यांनी जागा निश्‍चित केल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून डॉक्टर तसेच इतर स्टाफ दिला जाणार असला तरी अजून पद भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शहरवासीयांना बरीच प्रतीक्षा करावी लागेल, अशी चिन्हे आहेत.
केंद्राने उपकेंद्रे मंजूर करत असताना एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. १५ व्या वित्त आयोगातून सात कोटी ४४ लाखांचा निधी मिळाला आहे. यासाठी महापालिकेकडून जागा निश्‍चित करायच्या होत्या. प्रथम वॉर्ड दवाखान्यांमध्येच सुरू करण्याचा विचार झाला. काही ठिकाणी भाडेतत्त्वावर इमारती घेण्याचेही ठरले. यानुसार प्रक्रिया सुरू असताना नंतर दुसऱ्याच ठिकाणी केंद्र सुरू करायचे ठरवले. त्यासाठी जागांचा शोध सुरू केला. चार महिन्यांनंतर आता जागा निश्‍चित केल्या आहेत. महापालिकेच्या अस्तित्वात असलेल्या इमारतींचा वापर केला जाणार आहे. केंद्राच्या नियमाप्रमाणे या इमारतीचे नूतनीकरण केले जाणार आहे. सध्या निश्‍चित केलेल्या इमारतींचे नूतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून त्याचे काम सुरू केले जाणार आहे.
तोपर्यंत पद भरती पूर्ण करायची गरज आहे. या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेकडून पद भरती केली जात आहे. एमबीबीएस डॉक्टरसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पहिल्या टप्प्यात काढलेल्या जाहिरातीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा प्रयत्न केला जाणार आहे. यातून पद भरतीसाठी किती वेळ लागणार याचा अंदाज येणे कठीण आहे. प्रत्येक केंद्रात रक्ततपासणी मोफत केली जाणार आहे. केंद्रासाठी लागणारी विविध प्रकारची मशिनरी तसेच पदे भरण्याची गरज आहे. ही सारी प्रक्रिया प्रशासनाच्या लालफितीतून जेव्हा पूर्ण होईल तेंव्हाच केंद्र सुरू होतील, अशी स्थिती आहे.
----------------
चौकट
आढाव्यानंतरच गती
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकपदाचा कार्यभार तुकाराम मुंडे यांनी स्वीकारल्यानंतर या केंद्रांबाबत आढावा घेतला. त्यांनी यंत्रणेचे कान टोचल्यानंतर प्रक्रियेला वेग आला होता, पण आता त्यांची बदली झाल्याने पुन्हा या प्रक्रियेला मरगळ येते की काय, अशी स्थिती आहे.