चारवरून दिवसाआड पाणी पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारवरून दिवसाआड पाणी पुरवठा
चारवरून दिवसाआड पाणी पुरवठा

चारवरून दिवसाआड पाणी पुरवठा

sakal_logo
By

चारवरून दिवसाआड पाणीपुरवठा
इचलकरंजीकरांना दिलासा; पंचगंगेतून पाणी उपसा सुरू होणार

इचलकरंजी, ता. १२ ः काही दिवसांपासून पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद केला होता. मात्र आता नदी प्रवाहित झाल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा पंचगंगा नदीतून पाणी उपसा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत आज पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील नागरिकांना एक दिवस आड पाणी मिळणार आहे.
शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पण आठ दिवसांपूर्वी पंचगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह थांबला. त्यामुळे नदीतील पाण्याचा उग्र वास येऊ लागला. पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले. खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद केला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते. दोन ते तीन दिवस तर कधी चार दिवस आड पाणी मिळत होते. त्यामुळे नागरिकांनी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते.
दुसरीकडे नदी प्रवाहित करण्यासाठी प्रशासन पातळीवरून पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे धरणातून पाणी सोडल्यामुळे पंचगंगा नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे. नदीतील पाण्याचा दर्प कमी झाला आहे. त्यामुळे उद्यापासून पंचगंगा नदीतून पाणी उपसा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. खबरदारी म्हणून आज नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याला अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. उद्या सकाळपर्यंत अहवाल मिळणे अपेक्षित आहे.
--------
नऊ एमएलएडी पाणी मिळणार
पंचगंगा योजनेतून दररोज नऊ एमएलडी पाणी मिळते. कृष्णा आणि पंचगंगा नदीतील पाणी एकत्र करुन ते वितरीत केले जाते. कृष्णा योजनेच्या जलवाहिनी गळतीमुळे अनेकवेळा पंचगंगा योजना तारक ठरली आहे. त्यामुळे ही योजना कालबाह्य होऊनही या योजनेचे महत्त्‍व आजही कायम आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मोठी मदत होते.