
भाजप ताराराणी पत्रकार परिषद
काँग्रेस आघाडीची सत्ता असताना
भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस
मुख्यमंत्र्यांकडे करणार चौकशीची मागणी
कोल्हापूर, ता. १२ ः महानगरपालिकेत १५ वर्षांहून अधिक काळ काँग्रेस आघाडीची सत्ता असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली. या कालावधीत शासन, जिल्हा नियोजनच्या निधीतील रस्ते, अन्य कामे निकृष्ट झाली असून चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजप-ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कारभारावर टीका केली.
महापालिकेला भ्रष्टाचार, टक्केवारी, गुंडगिरीचा अड्डा बनवणारे, प्रचंड आर्थिक नुकसान पोहोचवणारे काहीजण भ्रष्टाचाराबाबत कॉँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनात सहभागी होते. त्यामुळे हे आंदोलन निव्वळ नौटंकी आहे, अशी टीका करत माजी नगरसेवक सत्यजीत कदम, माजी महापौर सुनील कदम, अजित ठाणेकर म्हणाले, ‘‘काँग्रेस आघाडीच्या सत्तेवेळी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे काही नेते, पदाधिकारी, नगरसेवकांचा सहभाग होता, हे जनतेला माहिती आहे. यावेळी टक्केवारीची सवय लावली. माजी लोकप्रतिनिधीने १८ टक्के मागणे, रस्ते निधीतील २२ टक्के रक्कम माजी मंत्र्याने अॅडव्हॉन्स घेणे याची चर्चाही झाली. पंचगंगा स्मशानभूमीसाठी एकाने पत्रे दिले असता माजी महापौरांच्या नातलगाने त्याचे टेंडर काढायला लावले. दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर निकृष्ट काम केले. नगरोत्थान, अमृत योजनेची कामे पूर्ण झाली नाहीत. अधिकाऱ्यांच्या मारहाणीत काही माजी पदाधिकारी, नगरसेवक सहभागी होते. माजी मंत्र्यांच्या दडपणापुढे अधिकारी गप्प बसले. धमकावून टेंडर भरू न देणे किंवा काम त्यांना करू न देता आपण करणे असाही प्रकार बोकाळला आहे. यात माजी महापौरांच्या नातलग आघाडीवर आहे. दोन कोटींच्या कामासाठी आलेल्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावून ते काम पदरात पाडून घेण्यापर्यंत त्याची मजल गेली. हिम्मत असेल तर त्यांनी चुकांची कबुली द्यावी; मगच दुसऱ्याकडे बोट करावे.’’ खराब रस्त्यांमुळे बळी गेल्यास अधिकारी, ठेकेदारांना जबाबदार धरावे; असे पत्र जिल्हाधिकारी, आयुक्तांना देणार असल्याचे सांगितले. यावेळी विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, वैभव माने उपस्थित होते.