
अंतिवडे अधिकाऱ्यांची आज बैठक
अंतिवडेतील प्रश्नांबाबत
आज अधिकाऱ्यांची बैठक
शिवसेना ठाकरे गटाने घेतला पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः जिल्ह्यातील अंतिवडे (ता. भुदरगड) या गावातील विविध प्रलंबित कामांसाठी उद्या (मंगळवारी) सकाळी आठ वाजता संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने पुढाकार घेतला असून, गावातील सर्व प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने आज ‘अंतिवडे गाव प्रचारात ‘नॉट रिचेबल’ अशा मथळ्याखाली याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
गावात वन विभाग सरपणासाठी वाळलेल्या झाडांच्या फांद्या तोडू देत नाहीत. गावातील खराब झालेले विजेचे खांब कधीही पडून अपघात होऊ शकतात. पण, महावितरण त्याठिकाणी लक्ष देत नाही. उन्हाळ्यात जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. एवढेच नव्हे, तर अचानक काही आपत्ती आली तर पै-पाहुण्यांना किंवा सरकारी यंत्रणेला मोबाईलवरून संपर्क साधावा म्हटले तर रेंज मिळत नाही. गारगोटीपासून केवळ तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावातील प्रलंबित कामांची ही यादी मोठी असली तरी एकही लोकप्रतिनिधी या गावाकडे फिरकलेला नाही. या पार्श्वभूमीवर या गावाची व्यथा ‘सकाळ’ने सर्वांसमोर आणली आहे.