
ऑनलाईन फसवणूक
३७८ चा शर्ट पडला दीड लाखाला
गडहिंग्लजला ऑनलाईन फसवणूक : पोलिसांत तक्रार, एकावर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : कॅन्सल झालेल्या शर्टचे ३७८ रुपये परत अकाऊंटवर पाठविण्यासाठी संपर्क केलेल्या एका व्यक्तीने गडहिंग्लजमधील एका ग्राहकाची १ लाख ५३ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली. संजय साळुंखे यांनी आज दिलेल्या तक्रारीवरून ज्या मोबाईल क्रमांकावरून ही फसवणूक झाली, तो मोबाईल वापरणाऱ्या राजू कुमार नावच्या व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी, मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील संजय साळुंखे नोकरीनिमित्त गडहिंग्लजला राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका कंपनीच्या अॅपवरून ऑनलाईनद्वारे ३७८ रुपयांचा शर्ट ऑर्डर केला होता, परंतु काही कारणाने ती ऑर्डर कॅन्सलही केली होती; मात्र त्याचे पैसे साळुंखे यांच्या खात्यात येणे बाकी होते. दहा दिवसांत ही रक्कम मिळेल असे त्या शॉपिंग कंपनीतून सांगितले होते. दरम्यान, राजू कुमार या व्यक्तीने साळुंखे यांना मोबाईलवरून संपर्क साधला. शॉपिंग कंपनीतून बोलतोय, असे सांगत त्याने कॅन्सल झालेल्या ऑर्डरचे ३७८ रुपये तुमच्या खात्यात पाठवायचे असून, ट्रायलसाठी गुगल पेद्वारे एक रुपये पाठविण्यास साळुंखेंना सांगितले; परंतु एक रुपये पाठवूनही ते पोहचले नाहीत. त्यानंतर राजू कुमारने साळुंखे यांना एनी डेस्क अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. दरम्यान, आज स्टेट बँकेच्या शाखेतील अकाऊंटवरून १ लाख ५३ हजार ५३० रुपये काढल्याचा मॅसेज साळुंखे यांच्या मोबाईलवर आला. हे पाहून धक्का बसलेल्या साळुंखेंना आपली कोणी तरी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद नोंदविली. राजू कुमार या व्यक्तीने ही फसवणूक केल्याचे त्यांनी फर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके करीत आहेत.