
अनुचित प्रकार घडल्यास तातडीने विशेष पथक दाखल
83647
शैलेश बलकवडे
---------------------
अनुचित प्रकार घडल्यास
तातडीने विशेष पथक दाखल
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे; इचलकरंजीत बैठक
इचलकरंजी, ता. १३ : मतदानादिवशी अनुचित प्रकार घडू नये याबाबत खबरदारी घेतली आहे. त्यातूनही असे घडल्यास तातडीने विशेष पथक घटनास्थळी दाखल होईल. त्यापद्धतीने पथकांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी येथील अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुका शांततेत होण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सुरू असणाऱ्या नियोजनाची माहिती दिली.
ते म्हणाले, ‘ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी अवैध धंद्यांसह, ओपर बारवर निवडणूक संपेपर्यंत कारवाई सुरूच राहणार आहे. या कालावाधीत ग्रामीण भागातील हॉटेल, खाद्यपदार्थ दुकाने रात्री दहापर्यंत तर शहरी भागातील रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहिल, असा आदेश काढला आहे.’
प्रत्येक गावात उमेदवार सोशल मिडीयाचा वापर करून प्रचार करत आहेत. मात्र याचा वापर केवळ प्रचारासाठी न होता त्यातून कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा घटना समोर येत आहेत. धार्मिक भावना, वैयक्तिक खालच्या पातळीवर टिकाटिपण्णीमुळे सामाजिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सायबर सेलच्या माध्यमातून त्यावर विशेष लक्ष आहे. मतदानादिवशी एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्वरीत घटनास्थळी पोहोचण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. व्हेईकल पेट्रोलिंग करून अशा घटनांवर नियंत्रण ठेवले जाईल. तसेच पोलिसांचे मनुष्यबळ लक्षात घेता ठराविक गावांचे क्लस्टर करून यासाठी विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधिक्षक रामेश्वर वैंजणे उपस्थित होते.
---------
उमेदवारांना १४९ नुसार नोटीस
उमेदवारांकडून प्रचार करताना मोठा जमाव केला जातो. या जमावातून एखादा गैरप्रकार घडल्यास त्या उमेदवाराला दोषी ठरवले जाईल. यासाठी निवडणुकीला उभारलेल्या प्रत्यके उमेदवाराला संभाव्य जमावातून होणारे अपराध रोखण्यासाठी १४९ नुसार नोटीसही दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी दिली.