पारावरची चर्चा…. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारावरची चर्चा….
पारावरची चर्चा….

पारावरची चर्चा….

sakal_logo
By

पारावरच्या गप्पा या सदरासाठी (Word Count : 135 CC : 9 Page Baskets: - Locations: -)

अरं, गुलाल तुझ्याच घरात....

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने गावागावांत प्रचाराचा धडाका सुरू आहे. खरं तर ही निवडणूक नात्यागोत्यात गुंतली आहे. सरपंच, सदस्यपदासाठी एकमेकांचे नातेवाईक एकमेकांच्या विरोधात मैदानात शड्डू ठोकून उभे आहेत. कागल तालुक्यातील पश्चिमेच्या टोकावर असलेल्या फराकटेवाडी गावातही जोमात, ईर्षेने प्रचार सुरू आहे. संपूर्ण गाव एकाच भावकीचे आणि प्रत्येकजण नात्याने भाऊबंद असतानाही टोकाच्या राजकीय ईर्षेमुळे येथे यंदा तीन पॅनेल तयार झालीत. यामध्ये एकाच घरातील दोघी सख्ख्या जाऊबाई दोन स्वतंत्र पॅनेलमधून एकमेकींसमोर उभा ठाकल्या आहेत. यापैकी एकीचा मुलगा प्रभागात मोठमोठ्याने प्रचार करत असताना गावातील चौकात पोहचला. येथे कठड्यावर बसलेल्या लोकांना, तो आपलेच पॅनेल कसे श्रेष्ठ आणि तुम्ही आम्हालाच का मतदान करावे? हे घसा फाडून सांगत होता. त्याचं सगळं ऐकून घेतल्यावर एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणाला, ‘आरं कशाला उगीच घसा कोरडा करालाईस ! कोण बी निवडून आलं तरी शेवटी गुलाल तुझ्याच घरात पडणार हाय नव्हं!’ त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांत एकच हशा पिकला, तर प्रचार करणाऱ्या त्या तरुणाने मात्र तेथून काढता पाय घेतला आणि पुढची गल्ली गाठली. - दत्तात्रय वारके, बिद्री
--------------------

एकदासं शौचालय उभारलं बाबा….
राधानगरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या राजधानीच्या समजल्या जाणाऱ्या एका गावात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. गावातील ‘मन-से’ उत्तम काम करणारा एक कार्यकर्ता सदस्यपदाची निवडणूक लढवत आहे. त्याच्या घरी शौचालय नव्हते. उमेदवारी अर्जाबरोबर शौचालय असल्याचा दाखला जोडावा लागतो. दाखला नाही जोडला, तर उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याचा धोका होता. म्हणून त्यानं खास निवडणूक लढवण्यासाठी चार दिवसांत शौचालय बांधलं व उमेदवारी अर्ज भरून निवडणूक रिंगणात उतरला. आता निकाल काहीही लागो, निवडणुकीच्या निमित्ताने घरी शौचालय बांधल्याचे समाधान त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना मिळाले आहे.- सुहास जाधव, शाहूनगर
-------------------


हातात भंडारा अन्‌ नेत्यांना आदेश
पाच वर्षे गायब असलेले उमेदवार आज निवडणूक निमित्ताने मतदाराच्या हाता-पाया पडत आहेत; पण निवडणुकीत शपथा, भानामतीचे प्रकार हे पडद्याआड घडत आहेत. असाच प्रकार कोल्हापूर शहरानजीकच्या एका ग्रामपंचायतमध्ये घडला. गावात प्रचाराची रॅली सुरू असताना गटनेत्यानं नव्या उमेदवारांच्या हातात ‘भंडारा’ दिला अन्‌ रॅली संपेपर्यंत हात जोडूनच चाला, असा आदेश गटनेत्यांनी देऊन ते सर्वात पुढे चालू लागले. मात्र असे का असावे, हे मात्र नवागत उमेदवारांच्या लक्षात आले नाही. नवे उमेदवार बिचारे हा प्रचाराचाच एक भाग असेल, हे समजून हात अवघडले तरी जोडलेला हात खाली न सोडता केविलवाण्या हास्य नजरेने मतदारांकडे पाहत पुढे सरकत होते. गाव मोठं असल्याने कार्यकर्त्यांसह उमेदवार पुढची गल्ली गाठत होते. गावातील सर्व वॉर्ड फिरून झाल्यावर गट नेत्याचा आदेश येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. रॅली होऊन चार दिवस उलटले तरीही अखंड हात जोडण्यातील रहस्य काय हे कार्यकर्त्यांना आज अखेर समजलेले नाही. याची मात्र वेगवेगळ्या भाषेतून गावात ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे.
- प्रकाश पाटील, कंदलगाव
------------------