
रस्त्यावरील बंद ३८ वाहनांना तीन दिवसांची मुदत
68333
कोल्हापूर : रस्त्यावर बंद अवस्थेत असलेल्या वाहनांना महापालिकेतर्फे नोटीस चिकटविताना कर्मचारी.
रस्त्यावरील बंद ३८ वाहनांना
तीन दिवसांची मुदत
महापालिकेकडून नोटीस; वाहतुकीस अडथळा ठरल्याने कारवाई
कोल्हापूर, ता. १३ : शहरातील रस्त्यावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ३८ वाहनांना महापालिकेने तीन दिवसांची मुदत दिली आहे. त्याची नोटीस त्या वाहनांवर लावली असून मुदत संपताच संबंधित वाहने जप्त केली जाणार आहेत. या वाहनांमुळे वर्दळीच्या अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे.
तांबट कमान, पद्माराजे उद्यान, भगतसिंग तरुण मंडळ, दसरा चौक, विल्सन पूल परिसरातील बंद असलेल्या ३८ वाहनांना नोटिसा चिकटविण्यात आल्या आहेत. नोटिसीची मुदत तीन दिवसांची असून संबंधितांनी रस्त्यावरील ही वाहने काढली नाहीत, तर अतिक्रमण निर्मूलन विभाग व विभागीय कार्यालयातर्फे ती जप्त करण्यात येणार आहेत. रस्त्यावर बंद अवस्थेत असलेली वाहने हटविण्याची कार्यवाही अतिक्रमण निर्मूलन विभाग व संबंधित विभागीय कार्यालयातर्फे १२ तारखेपासून सुरू करण्यात आली आहे. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी वाहने एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभी आहेत. रस्ते, पूल, उड्डाण पूल अशा ठिकाणी अनधिकृतपणे रस्त्यावर सोडून दिलेली आहेत. अशी वाहने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करत असून अपघातसदृश स्थिती तयार करत आहेत. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले असून विभागांनी पाहणी करून नोटिसा लावल्या आहेत.