गव्यांचा मुक्काम नदीकाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गव्यांचा मुक्काम नदीकाठी
गव्यांचा मुक्काम नदीकाठी

गव्यांचा मुक्काम नदीकाठी

sakal_logo
By

गव्यांचा मुक्काम नदीकाठी
आठ दिवसांपासूनची स्थिती; वन विभागाचे २४ तास लक्ष

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः शहराच्या परिसरात गेल्या आठवड्यात आलेल्या गव्यांचा मुक्काम अद्याप नदीकाठच्या परिसरातच आहे. आज विन्स हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या शेताच्या पुढील भागात सकाळी गवे दिसल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. सायंकाळी ६.३० वाजता गव्यांचे दर्शन झाले होते. त्यानंतर मात्र ते दिसलेले नाहीत. गवे नदीपलीकडे गेले आहेत का? याची पाहणी वन विभागाचे कर्मचारी करत आहे; मात्र आठ दिवसांपासून गव्यांचा मुक्काम नदीकाठच्या परिसरातच असल्याचे येथील शेतकरी सांगतात.
शहराच्या नदीकाठच्या शेतांमध्ये या वर्षात दोन वेळा गवे आले. सादळे-मादळे परिसरातून हे गवे आले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या गव्यांचा मुक्काम अजूहनही नदीकाठी आहे. हा चार गव्यांचा कळप असून, यामध्ये तीन नर आणि एक मादी आहे. पंचगंगा स्मशानभूमीच्या पुढील शेती, विन्स हॉस्पिटलच्या मागील भागातील शेतवडी, रमणमळा परिसरातील शेत जमिनी या भागात गव्यांचा वावर आहे. दोन दिवसांपूर्वी गव्यांचा हा कळप नदीपलीकडील वडणगेच्या हद्दीतील बंडगर मळा परिसरात आढळला होता; मात्र आज हा कळप पुन्हा विन्स हॉस्पिटलमागील शेतांच्या पुढील गवतात दिसला. येथील शेतकऱ्यांनी याची माहिती वन विभागाला दिली आहे. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत गवे या परिसरात होते; मात्र नंतर ते येथे दिसले नाहीत. त्यामुळे ते नेमके कोठे आहेत याचा शोध घेतला जात आहे. रात्री ९ वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात पाहणी केली; मात्र गवे येथे दिसले नाहीत.

अनुकूल स्थिती
नदीकाठी असणाऱ्या परिसरात सध्या उंच गवत आहे. ते ताजे असून, गव्यांना खाण्यासाठी आणि लपण्यासाठी योग्य आहे. पिण्यासाठी नदीचे पाणी आहे. तसेच शेतीची कामे फारशी नसल्याने या परिसरात माणसांचा वावर कमी असतो. ही सर्व परिस्थिती गव्यांना अनुकूल आहे. परिणामी गव्यांचा मुक्काम नदीकाठीच आहे.

कोट
गव्यांचे ठिकाण कोठे आहे याची माहिती आम्ही सतत घेतो. आज सायंकाळपर्यंत गवे विन्स हॉस्पिटलच्या मागील शेतांच्या भागात दिसले होते. आठ दिवसांत गव्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यात यश आले आहे. गवे त्यांच्या मूळ अधिवासात कसे जातील यासाठीच्या उपाययोजना वन विभाग करत आहे.
-विजय पाटील, वनपाल.