फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल
फुटबॉल

फुटबॉल

sakal_logo
By

अर्जेंटिना अंतिम फेरीत
मेस्सी- अल्वारेझची किमया, क्रोएशियावर ३-० मात

दोहा, ता. १३ ः मेस्सीचे ड्रीबलिंग आणि अल्वारेझचे फिनिशिंग या चमत्काराच्या जोरावर आज अर्जेंटिनाने विश्वकरंडक फुटबॉलच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी क्रोएशियाचा ३-० असा दणदणीत पराभव केला. निवृत्तीपूर्वी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सारे काही झोकून खेळणारा मेस्सी आज चाहत्यांना मैदानावर दिसला.

उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात आक्रमण हेच धोरण ठेवत मेस्सीच्या अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत सुरुवात केली. मेस्सीने आघाडीवर रहात आपल्या ड्रीबलिंगद्वारे क्रोएशियाच्या गोलजाळ्याच्या दिशेने धडका देण्यास सुरुवात केली. हा दबाव क्रोएशियाला सहन होत नव्हता आणि त्यातूनच गोलरक्षक लिव्हाकोविक याने गोल जाळ्याच्या दिशेने चेंडूसह निघालेल्या अर्जेंटिनाच्या अल्वारेझला पेनल्टी एरियात चुकीच्या पद्धतीने रोखले. पंचांनी तत्काळ अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. ही संधी मेस्सीने साधली आणि ३३ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने १-० अशी भक्कम आघाडी घेतली. मेस्सीचा विश्वकरंडकातील हा अकरावा गोल होता. त्याने या स्पर्धेत आधी दिएगो मॅरेडोना आणि आज बॅटिस्टुटा यांचा दहा गोलांचा विक्रम देशाकडून खेळताना मागे टाकला आहे.
आघाडीनंतरही अर्जेटिनाने आपल्या धोरणात कुठलाही बदल न करता आक्रमणे सुरूच ठेवली. अल्वारेझ, मोलिना यांनी मेस्सीच्या नेतृत्वाखाली क्रोएशिया दबावाखाली कसे राहील, याचे उत्तम नियोजन केले. त्याचा पूर्वार्धातच फायदा झाला आणि अर्जेंटिनाने आपली आघाडी २-० अशी भक्कम केली. मेड्रीचने रचलेले आक्रमण डाव्या बगलेतून अर्जेंटिनाच्या गोल पोस्टच्या दिशेने जात होते. त्यावेळी क्रॉस पास अर्जेंटिनाच्या रक्षकांनी रोखत तो अल्वारेजकडे दिला. त्याने मध्यरेषेपासून गोल पोस्टच्या दिशेने सुसाट धाव घेतली. त्याच्या या स्वप्नवत प्रतिआक्रमणाला अंतिम क्षणी नशीबाची साथ मिळाली. त्याच्याकडे दोन डिफ्लेक्शन आली. त्यातून त्याने क्रोएशियाचा गोलरक्षक लिव्हाकोविकला सहज चकवा देत ३९ व्या मिनिटाला गोल केला आणि निर्णायक आघाडी घेतली.
उत्तरार्धात पुन्हा मेस्सीची किमया कामी आली. त्याने उजव्या बगलेतून चेंडू अफलातून पद्धतीने ड्रिबलिंग करीत गोल पोस्टच्या दिशेने नेला. क्रोएशियाच्या बचावपटूंनी मेस्सीला जंग जंग पछाडले; पण मेस्सी थांबण्याच्या मूडमध्ये नव्हता. उजव्या बगलेतून अगदी छोट्या डीपर्यंत आल्यानंतर त्याने एका रक्षकाच्या दोन्ही पायांमधून हलकासा पास अल्वारेझकडे दिला आणि ६९ व्या मिनिटाला त्याने अर्जेंटिनाचा तिसरा तर स्वतःचा दुसरा गोल साकारला. यावेळी पाठीराख्यांनी तुफानी जल्लोष केला. सारे स्टेडियम मेस्सीच्या जयघोषाने दुमदुमत होते.


मेस्सी, मेस्सी एकच जल्लोष!
कोल्हापूर : मेस्सीच्या अर्जेंटिनाने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींनी एकच जल्लोष केला. मेस्सीने पेनल्टीवर पहिल्या गोलची नोंद करताच
त्याचे कट्टर फॅन असलेल्यांनी एकच जल्लोष केला. शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या मोठ्या स्क्रिनसमोर फुटबॉलप्रेमी रात्री बारा वाजता बसले होते. पूर्वार्धात अर्जेंटिनाला पेनल्टी मिळताच उत्कंठा वाढली. मेस्सीने गोल केल्यानंतर फुटबॉलप्रेमींना आनंद व्यक्त केला. दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलनंतर तर उत्साहाला एकच उधाण आले होते. स्क्रिनसमोरील गर्दीने शहरातील शौकिन फुटबॉलवर कसे प्रेम करतात, याची झलक दिसून आली.