
कॅन्सर उपचाराच स्टिरॉईडचा सैन्यभरतीत वापर
सैन्यभरतीत धावण्यासाठी ‘स्टेरॉईड’चा वापर
अश्विन ठाकरे; शाहूपुरीतील एका होलसेल औषध विक्रेत्यांकडून विक्री
कोल्हापूर, ता. १४ ः अग्निवीर सैन्यभरतीत धावण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून कर्करोगावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईड इंजेक्शनचा वापर झाला आहे. शाहूपुरीतील एका होलसेल औषध विक्रेत्यांकडून याची विक्री झाली असून, त्याला औषध विक्री करण्यासाठी बंदी घातली आहे. याची साखळी परजिल्ह्यात, राज्यातही असून, त्याच्या मुळापर्यंत जाण्याचे काम सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अश्विन ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, अग्निवीर सैन्य भरतीत स्टेरॉईड इंजेक्शन घेणाऱ्या एका संशयिताचा शोध राजारामपुरी पोलिसांनी लावला आहे. त्याच्याकडून अधिक माहिती घेऊन या इंजेक्शनचे नेमके कनेक्शन कोठे आहे, याचाही तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. एकाच गुन्ह्यात आता राजारामपुरी पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपास सुरू झाला आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अग्निवीर सैन्य भरतीत धावण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून स्टेरॉईड इंजेक्शनचा वापर झाल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी काही इंजेक्शन जप्त करून एका संशयिताकडेही चौकशी केली. त्यानुसार जे इंजेक्शन जप्त केले आहे, त्याचा क्रमांक पाहून ते कोठून विक्री झाली, याची माहिती घेतली तेव्हा शाहूपुरीतील होलसेलरकडून त्याची विक्री झाल्याचे दिसले. त्यामुळे त्या विक्रेत्याला औषध विक्री करण्यास बंदी घातली आहे. प्रथमदर्शनी विक्रेत्याकडून १२ इंजेक्शनची विक्री झाली असून, गोदामातून १८ इंजेक्शन मिळाली आहेत. त्याने ज्यांना इंजेक्शनची विक्री केली आहे, तीही नियमबाह्य असल्याचे प्रथम दर्शनी दिसते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय त्या औषधाची विक्रीच करता येत नाहीत, ती नियमबाह्य विक्री कशी झाली, याची चौकशी सुरू केली आहे. तपास पूर्ण झाल्याशिवाय नावे जाहीर केली जाणार नाहीत.
कोट
अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेच्या ठिकाणी ग्रामीण भागातील एका भरतीपूर्व ट्रेनिंग सेंटरच्या व्यक्तीकडे स्टेरॉईडचे इंजेक्शन मिळाले. ते जप्त करून त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. त्या इंजेक्शनला बंदी नाही. मात्र, प्रातांधिकाराच्या आदेशाचा भंग केल्याची नोंद पोलिस ठाण्यात केली आहे.
-ईश्वर ओमासे, निरीक्षक, राजारामपुरी पोलिस ठाणे