
गावांचा उत्पन्नात उच्चांक
लोगो- जिल्हा परिषद
दहा गावांचा उत्पन्नात उच्चांक
शहरीकरण, उद्योगांनी दिले बळ; पायाभूत सुविधांसाठी मात्र होतेय कसरत
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींनी उत्पन्नात उच्चांक गाठला आहे. यात शहराच्या वेशीवर असणाऱ्या, एम.आय.डी.सी.च्या बाजूने असणाऱ्या गावांचा समावेश आहे. या गावांचे उत्पन्न वाढत जाईल, तसतसा त्यांच्या पायाभूत सुविधांचाही प्रश्न निर्माण होत आहे. सांडपाणी, कचरा यांचे व्यवस्थापन करणे आणि मिळकतींच्या नोंदी, कर आकारणी व गावाची सुरक्षितता या सर्व बाबींसाठी ग्रामपंचायतींना मोठी कसरत करावी लागणार आहे.
ग्रामीण भागातही नागरीकरणाचे प्रमाण वाढत आहे. तालुक्याच्या गावांचे नगरपंचायतीत रुपांतर केले जात आहे. जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक गावांची संख्या ५ हजारांपेक्षा अधिक आहे, तर १० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांची संख्या ४५ इतकी आहे. गावांची लोकसंख्या वाढत असली तरी त्यांच्या उत्पन्न व खर्चाचा मेळ घालताना मात्र ग्रामपंचायतींना कसरत करावी लागते. यासाठी मोठ्या गावांच्या उत्पन्न वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या तरी असे होताना दिसत नाही. अशीच अवस्था सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या गावांचीही आहे.
जिल्ह्यात १० ग्रामपंचायतींचे उत्पन्न हे इतर गावांच्या तुलनेत कैकपटीने अधिक आहे. यात उचगाव, पाचगाव, कळंब तर्फे ठाणे, उजळाईवाडी (ता. करवीर), कोडोली (ता. पन्हाळा), शिरोली पुलाची, अतिग्रे (ता. हातकणंगले), नांदणी, यड्राव (ता. शिरोळ), कसबा सांगाव (ता. कागल) या गावांचा समावेश आहे. या गावांचे उत्पन्न कोटींच्या पुढे आहे. तसेच शहराभोवतीच्या गावांची लोकसंख्या व उद्योग व्यवसायांची संख्या वाढत असल्याने उत्पन्नही वाढणार आहे; मात्र उत्पन्न वाढत असताना पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या गावांसाठी कुशल मनुष्यबळ, तांत्रिक मार्गदर्शन आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गावांच्या सुविधा व उत्पन्नात वाढ करणे याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
....
चौकट
उचगाव- ६ कोटी ६३ लाख ३ हजार ७३६
कोडोली- ५ कोटी १४ लाख ६२ हजार ७३
पाचगाव- ४ कोटी १७ लाख १० हजार ४८०
शिरोली पुलाची- २ कोटी ८५ लाख ४९ हजार ६७४
नांदणी- २ कोटी ३६ लाख ७२ हजार १४५
अतिग्रे- २ कोटी २१ लाख ९५ हजार ९५५
उजळाईवाडी- १ कोटी ९३ लाख ७० हजार ५९७
कळंबे तर्फ ठाणे- १ कोटी ८९ लाख ६ हजार ७७
यड्राव- १ कोटी ७७ लाख १५ हजार २५२
कसबा सांगाव- १ कोटी ४४ लाख २७ हजार ६७७
....
कोट
जिल्ह्यातील मोठ्या उत्पन्नाच्या गावांचे प्रश्नही मोठे आहेत. गावामध्ये पायाभूत सुविधा पुरवणे, आरोग्याच्या सुविधा देणे याचबरोबर सांडपाणी व घनकचऱ्याचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. जेवढे उत्पन्न मोठे आहे, तेवढा खर्चही वाढत आहे; मात्र खर्चाच्या तुलनेत सुविधा मात्र अपूर्ण आहेत. यासाठी ५ हजार, १० हजार तसेच १५ हजार लोकसंख्येवरील गावांच्या विकासासाठी व सोयीसुविधांसाठी जिल्हा परिषद स्तरावरून वेगळे नियोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग.