
बाजार समिती
बाजार समितीची निवडणूक
१५ मार्चपर्यंत पुढे ढकलली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १५ मार्चपर्यंत पुढे ढकलावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. बाजार समितीचे माजी संचालक ॲड. किरण पाटील, नाथाजी पाटील यांनी बाजार समितीची निवडणूक तसेच ग्रामपंचायत समितीच्या सदस्यांची मतदार नोंदणी व त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी निवडणूक नंतर घ्यावी, अशा आशयाची याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने निवडणूक पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.
समितीकडून कच्च्या मतदारांची यादी सहकार प्राधिकरणाने मागून घेतली होती. विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांची नावे यादीमध्ये आहेत आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका समितीच्या निवडणुकीपूर्वी होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत नव्याने निवडून येणारे सदस्य समितीच्या मतदानापासून वंचित राहू शकतात. यातून पुढे समितीची निवडणूक कायदेशीर की, बेकायदेशीर असा तांत्रिक पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.