
गडहिंग्लजला वर्षभरात दीड टन प्लास्टिक जप्त
gad1412.jpg
68534
गडहिंग्लज : पालिकेच्या पथकाने वेळोवेळी राबवलेल्या मोहिमेत प्लास्टिक जप्तीची कारवाई करून दंड वसूल केला.
-------------------------------------------------------
गडहिंग्लजला वर्षभरात
दीड टन प्लास्टिक जप्त
नगरपरिषदेची कारवाई : अडीच लाखांहून अधिक दंड वसूल
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : येथील नगरपरिषदेने अलीकडील दोन वर्षांपासून शहरात प्लास्टिकविरोधी कारवाईची मोहीम गतीने राबवली आहे. वर्षभरात तब्बल दीड टन प्लास्टिक जप्त करण्याबरोबरच २ लाख ७० हजारांचा दंडही वसूल केला आहे.
शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. त्याची अंमलबजावणी गडहिंग्लज नगरपरिषदेकडून सुरू करण्यात आली. सुरुवातीला प्लास्टिकविरोधी मोहिमेत सातत्य राहिले नाही. त्यामुळे कारवाईत नव्याचे नऊ दिवस राहत होते. नंतर पुन्हा प्लास्टिकचा वापर वाढत गेला. अधून मधून होणाऱ्या कारवाईपुरतीच बंदी असे चित्र पाहायला मिळाले होते. दरम्यान, वर्षभरापासून मात्र पालिका प्रशासनाकडून प्लास्टिकविरोधी कारवाई सातत्याने होऊ लागली. मध्यंतरी पालिकेच्या पथकाने एका व्यावसायिकाकडे असलेला प्लास्टिकचा मोठा साठाच जप्त केला. त्यामुळे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांत भीतीचे वातावरण तयार झाले. प्लास्टिकचा अधिकाधिक वापर करणाऱ्या फेरीवाल्यांकडून, तसेच भाजी विक्रेत्यांकडूनही प्लास्टिक जप्तीसह दंड वसूल करण्यात आला.
दीड वर्षात पालिकेने १४०० किलो प्लास्टिक जप्त करण्याबरोबरच अडीच लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल केला. कारवाईतील सातत्यामुळे शहरातील प्लास्टिक वापरावर नियंत्रण आल्याचे चित्र असून भविष्यात यात सातत्य राहिल्यास प्लास्टिकच्या समूळ उच्चाटनास मदत होणार आहे.
------------------
प्लास्टिकला पर्याय
एका बाजूने प्लास्टिक वापरावर जोरदार निर्बंध आणत असताना पालिकेकडे प्लास्टिकला पर्याय देण्याची मागणी होत होती. त्यानुसार मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्या पुढाकाराने एका कंपनीच्या सीएसआर फंडातून पाच रुपये नाणे टाकून कापडी पिशवी उपलब्ध करून देणारे मशिन बसवले आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद असल्याने शहरातील विविध भागांत असे मशिन बसवण्याचा मानस पालिकेचा असल्याचे श्री. खारगे यांनी सांगितले.