
रंकाळा स्थिती
महापालिकेचे पितळ उघड
रंकाळा प्रदूषणप्रश्न ः खर्च केलेल्या ठिकाणातून पाणी तलावात
कोल्हापूर, ता. १६ ः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाबाबत दिलेल्या नोटीसमुळे महापालिका रंकाळा तलावात मिसळत असलेले सांडपाणी रोखण्यात अपयशी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी नाला वळवण्यासाठी निधी खर्च झाला, तिथूनही प्रदूषण होतच असल्याची गंभीर स्थिती आहे. यामुळे सध्या सुशोभीकरणासाठी आलेला नऊ कोटींचा निधी प्रदूषण रोखण्यासाठीच वापरला जाणे संयुक्तिक ठरणार असून, गेल्या महिन्यापासून रंकाळा व पर्यावरणप्रेमी त्याचीच मागणी करत आहेत.
पाणलोटमधून होत असलेल्या प्रदूषणाने तलावात जलपर्णी, हिरवे झालेले पाणी, प्रचंड दुर्गंधी, जलचर मरण्याचे प्रकार झाले आहेत. याबाबत रंकाळाप्रेमींनी सातत्याने आवाज उठवत महापालिकेवर कारवाई करत राहिल्याने पूर्वीची स्थिती बरीच बदलली आहे. पण, पाणलोटमधील प्रदूषण महापालिकेला थांबवता आलेले नाही. त्यासाठी दोन नाल्यांवर उपसा केंद्र सुरू केले असले तरी त्याबरोबरच इतर ठिकाणांहूनही सांडपाणी तलावात मिसळत असल्याचे नुकत्याच केलेल्या पाहणीतून दिसले. तलावात मिसळणारे सांडपाणी अडवून दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे नेण्याकरिता ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी महापालिकेने मोठा निधी खर्च केला. त्यानंतर काही टक्के सांडपाणी मिसळत असून, तेही पुढील वर्षापर्यंत वळवले जाणार असल्याचा दावा महापालिका करत आहे. प्रदूषण नियंत्रणने दिलेल्या नोटीसप्रमाणे ११ ठिकाणांमध्ये यापूर्वी जिथून पाणी वळवण्याची कामे केलेली ठिकाणेही आहेत.
या प्रकारामुळे महापालिकेला सांडपाणी पूर्ण क्षमतेने वळवता आलेले नाही हे स्पष्ट झाले आहे. काम केलेल्या ठिकाणाहून जर सांडपाणी वाहत असल्याने एकतर ते काम चुकीचे झाले आहे किंवा त्याचा वापर व्यवस्थित केला जात नाही. पावसाळ्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पाणी रोखायचेच या उद्दिष्टाप्रमाणे काम केले जात नाही. काही तक्रार झाल्यास शाम सोसायटी नाल्यातून वाहणारे पाणी अडवले जाते. मात्र, अनेकदा ते पाणी वाहत राहते. तसेच शाहू उद्यानाजवळच्या नाल्यातून तसेच तिथे बसवलेल्या स्वच्छतागृहातील सांडपाणी रंकाळ्याच्या दिशेने जाते. सरनाईक वसाहतीकडील नाल्यातील पाणी तलावात घातलेल्या पुलाखालील वाळूंच्या पोत्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न किती तोकडा आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच लक्षात येते. सानेगुरुजी वसाहतीकडून येणारे व परताळ्यात आजूबाजूच्या वसाहतीमधील सांडपाणी रोखण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेकडून गांभीर्याने काम केले पाहिजे. केवळ अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकल्या व त्या मुख्य लाईनला जोडल्याने सांडपाणी रोखले जाणार नाही.
चौकट
पावसाळा सोडल्यास नाले कोरडेच पाहिजे
रंकाळ्यात येणारे सांडपाणी रोखण्याच्या कामांचा विचार होतो, त्यावेळी अधिकाऱ्यांकडून पावसाची चर्चा केली जाते. पावसाचे पाणी तलावात येणार असे सांगितले जाते. ते पाणी सोडल्यास इतरवेळी जिथून सांडपाणी येते, त्या ठिकाणांची गंभीरपणे पाहणी करून ते पाणी ड्रेनेज लाईनला वळवले पाहिजे. तरच पावसाळा सोडल्यास इतर वेळी हे वाहत येणारे नाले कोरडे होतील.