रंकाळा चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळा चौकशी
रंकाळा चौकशी

रंकाळा चौकशी

sakal_logo
By

तलावातील बांधकामाची चौकशी करा
उपमुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; तातडीने होणार बैठक

कोल्हापूर, ता. १६ ः शासन निधीतून करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक रंकाळा तलावातील बांधकामाबाबतच्या तक्रारीची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्याकडे प्रहार प्रतिष्ठानने याबाबत तक्रार केली होती. दरम्यान, प्रतिष्ठानने त्या पत्राबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी लवकरच या पत्रानुसार तातडीने बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
राज्य शासनाने ९ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी मंजूर केला आहे. त्यातून कमानी, स्वच्छतागृहे, पार्किंग, पदपथ, धोबीघाट अशी विविध कामे करण्याचे नियोजन आहे. त्यातून तलावातील प्रदूषण वाढणार असल्याने प्रहार प्रतिष्ठान, इतर संघटना, रंकाळाप्रेमींनी विरोध केला. प्रहार प्रतिष्ठानने तलाव व परताळ्यात मिसळणाऱ्या दूषित पाण्याने जैवविविधता नाश पावत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळालाही निवेदन देऊन तपासणी करणे भाग पाडले होते. त्यानंतर मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडेही बांधकामांबाबत तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार त्यांच्या कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना या तक्रारीची चौकशी करण्याचे पत्र पाठवले आहे.
त्या पत्राच्या संदर्भाने प्रतिष्ठानचे अमर जाधव, चंद्रकांत यादव, आनंदराव चौगले, चंद्रकांत खोंद्रे, रवी चव्हाण यांनी जिल्हाधिकारी रेखावारांची आज भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार असलेल्या संजय शिंदे यांनी बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना रंकाळ्याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शासनाने दिलेल्या निधीचे पुनर्विलोकन करावे. अनाठायी होणारा खर्च थांबवावा. प्रदूषण, धोके वाढवणारे काम थांबवावे. प्रदूषण करणाऱ्या कामासाठी निधी खर्च होऊ नये. परिसरामध्ये ऑक्सिजन वाढविण्यासाठी वृक्षांची लागवडीसाठी वापरावा. कायमस्वरूपी कोणतेही बांधकाम करू नये. तीनही बाजूने येणारे दूषित पाणी बंद करावे. तसेच शुद्ध करून तलावात सोडण्याची व्यवस्था करावी. इराणी खाणीतील पाण्यात विषारी घटक असल्याने कायम दुर्गंधी असते. त्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी. रंकाळा तलाव, परताळ्यात कोणताही वाहनतळ असता कामा नये. तलाव तीनवेळा ओसंडून वाहिला आहे. नागरी वस्तीसाठी ही बाब अत्यंत घातक असून, मोठी जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक व्यवस्थेकडे महापालिकेने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे.