गोठा, पोल्‍ट्री, प्रक्रिया उद्योगांच्या नोंदी होणार कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोठा, पोल्‍ट्री, प्रक्रिया उद्योगांच्या नोंदी होणार कधी?
गोठा, पोल्‍ट्री, प्रक्रिया उद्योगांच्या नोंदी होणार कधी?

गोठा, पोल्‍ट्री, प्रक्रिया उद्योगांच्या नोंदी होणार कधी?

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ... लोगो
.....

गोठा, पोल्‍ट्री प्रक्रिया
उद्योगांच्या नोंदीच नाहीत

जिल्‍हा परिषदेच्या पुढाकाराची गरज; नेमक्या माहितीअभावी व्यवसायातील वास्‍तव चित्र अस्‍पष्‍ट

सदानंद पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. १६ : जिल्‍ह्यात २०० ते २० हजार पक्षांपर्यंतच्या पोल्‍ट्री काढण्यात आल्या आहेत. मात्र ५०० पक्षांच्या आतील पोल्‍ट्रींच्या नोंदीच करण्यात आलेल्या नाहीत. त्याचबरोबर जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात दुग्‍ध व्यवसायाने भरारी घेतली आहे. दहापेक्षा अधिक जातीवंत गायी, म्‍हशींचे गोठेही हजारोंच्या संख्येत पोहोचले आहेत. तसेच खासगी दूध डेअरी, चिलिंग सेंटर, प्रक्रिया उद्योगही भरमसाठ उभारण्यात आले आहेत. मात्र यांच्या नोंदीच नसल्याने आपत्‍कालीन परिस्‍थितीत अनेक अडचणी येत आहेत. तसेच जिल्‍ह्यात नेमके दुधाचे व दुग्‍धजन्य पदार्थांचे होणारे उत्‍पादन असो की कुक्‍कुटपालनातून होणारी उलाढाल, याची नेमकी माहिती उपलब्‍ध होत नसल्याने या व्यवसायातील वास्‍तव चित्र स्‍पष्‍ट होत नाही. त्यामुळे जिल्‍हा परिषदेने या व्यवसायांची माहिती संकलित करणे आवश्यक आहे.

जिल्‍ह्यातील हवामान, वातावरण, मुबलक पाऊस आणि पाणी यामुळे कृषी व पशुपालन तसेच संलग्‍न व्यवसायांना मोठा वाव आहे. त्यामुळेच हजारोंच्या संख्येने उभारण्यात आलेला पोल्‍ट्री व्यवसाय, खासगी दूध संस्‍था व दूध प्रक्रिया उद्योगांची रेलचेल झाली आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्‍लज या तालुक्यांमध्ये पोल्‍ट्री व्यवसायाचे मोठे जाळे आहे. तर त्यापाठोपाठ दुधावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्याही सातत्याने वाढत चालली आहे. दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी शेतकरी परराज्यातून जादा दूध देणाऱ्या ‍या जनावरांची खरेदी करत आहेत. सहकारी संघांबरोबरच आता खासगी दूध संघही मोठ्या ताकदीने जिल्‍ह्यात आपला विस्‍तार करत आहेत.

दूधसंघांना दूध पुरवठा करत असतानाच दु‍सऱ्या बाजूने दुधावर होणाऱ्या प्रक्रिया उद्योगांची संख्या वाढत चालली आहे. शिरोळ, करवीर, हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध प्रक्रिया उद्योगाने भरारी घेतली आहे. दुग्‍धजन्य पदार्थांना मोठी मागणी असल्यानेच हा उद्योग गतीने वाढत आहे. मात्र या सर्व उद्योगांची माहिती मात्र कोणत्याच सरकारी कार्यालयाकडे उपलब्‍ध नाही. तसेच काही बनावट उद्योग स्‍थापन करून शासनाच्या योजना लाटण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे या व्यवसायातील संधी किंवा अडचणी, याची माहिती उपलब्‍ध होत नाही. या सर्व उद्योग, व्यवसायांची नोंद करणे व गरज पडल्यास त्याच्या नूतनीकरणासाठी काही रक्‍कम लावल्यास जिल्‍हा परिषदेच्या उत्‍पन्‍नातही भर पडणार आहे.
....

‘पशुसंवर्धन विभागाने यातील काही माहिती संकलित करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र नेमकी माहिती उपलब्‍ध झालेली नाही. आता सर्वच विभागांना एकत्रित करुन अशी माहिती संकलित करणे आवश्यक आहे. याबाबत खातेप्रमुखांच्या बैठकीत सूचना देऊन उद्योग, व्यवसायांचे वर्गीकरण करणे, त्या व्यवसायातील उलाढाल, त्यातील संधी याची माहिती संकलित करुन ही माहिती प्रसिध्‍द करण्यात येईल. जेणेकरुन या व्यवसायांमध्ये येणाऱ्या‍ लोकांना त्या व्यवसायातील संधी, अडचणी समजून येण्यास मदत होईल.

संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद