पैलवान डोस नोटीसा पाठविल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैलवान डोस नोटीसा पाठविल्या
पैलवान डोस नोटीसा पाठविल्या

पैलवान डोस नोटीसा पाठविल्या

sakal_logo
By

दोघा औषध विक्रेतांना कारणे दाखवा नोटीस

‘अन्न व औषध प्रशासन’ची कारवाई : बेकायदेशीर ‘पैलवान डोस’ची विक्री रोखणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः ‘पैलवान डोस’ची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन औषध विक्री दुकानदारांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांची कायदेशीर चौकशी सुरू केली आहे. संबंधितांकडून खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई निश्‍चित होणार असल्याची माहिती सहायक आयुक्त (औषध) अश्‍विन ठाकरे यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिली.

‘रंकाळा’ आणि ‘गंगावेस’ या परिसरात ‘पैलवान डोस’ची विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. या परिसरात पैलवानांची संख्या अधिक आहे. किंबहुना नव्याने येणारे पैलवान या परिसरात राहतात. पैलवानांना त्यांची शरीरयष्टी भक्कम आणि धिप्पाड करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मात्र यातून ‘शॉर्टकट’ शोधला जातो आणि उत्तेजित होणे, वजन वाढणे, रक्त वाढण्यासारख्या गोळ्यांचा ‘कॉम्‍बो पॅक’ घेतला जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा ‘कॉम्बो पॅक’ची अनधिकृत विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी रंकाळा आणि गंगावेस परिसरातील दोन औषध विक्री करणाऱ्या दुकानदारांना कारणे दाखवा नोटीसा पाठविल्या आहेत. त्यांच्याकडे ‘पैलवान डोस’ मिळाल्यामुळेच या नोटिसा पाठविल्या आहेत, कायदेशीर चौकशी केल्यानंतरच कारवाई केली जाणार असल्याचे अधिकारी ठाकरे यांनी सांगितले.
-------

प्लास्टिक कागदात घालून विक्री
महिन्याचा ‘पैलवान डोस’ साधारण हजार ते बाराशे रुपयांना मिळत असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. कॉम्बोपॅकमध्ये सुट्या कॅप्सुल आणि पांढऱ्या रंगाच्या गोळ्यांचाही समावेश असून त्या प्लास्टिक कागदात घालून विक्री केल्या जातात. त्यामुळे ते बेकायदेशीर असल्याचेही सांगण्यात येते.
--------

हा प्रकार थांबला पाहिजे...
पैलवान बनण्यासाठी ‘पैलवान डोस’ किती धोकादायक आहे, याबाबतचे वृत्त आज दैनिक ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. वृत्त वाचून सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे नेते, सर्वसामान्य नागरिक यांनी हा प्रकार थांबला पाहिजे, यासाठी आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी असल्याची भूमिका ‘सकाळ’कडे व्यक्त केली आहे.