
खासबाग मैदानात वादावादी
69002
खासबाग मैदान परिसरात
अतिक्रमण कारवाईवेळी वाद
कोल्हापूर, ता. १६ ः प्रचंड वर्दळीच्या असलेल्या खासबाग मैदान परिसरातील सहा हातगाड्या व फलक जप्त करण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज सायंकाळी केली. यावेळी काही व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांशी वाद घातला.
गर्दीच्या ठिकाणच्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. सायंकाळी त्यातील पथक खासबाग मैदान परिसरात आले होते. एक आईस्क्रीमची हातगाडी रस्त्यावर असल्याने वाहतुकीला अडथळा करत होती. त्याचवेळी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात महापालिका कर्मचाऱ्यांची कार्यशाळा सुरू होती. त्यावेळी त्या गाडीबाबत असलेल्या तक्रारीनुसार त्यासह आजूबाजूच्या सहा हातगाड्या, काही फलक पथकाने जप्त केले. यावेळी काही व्यावसायिकांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत वाद घातला. एका माजी नगरसेवकाचाही उल्लेख केला. कारवाई नियमानुसार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. इस्टेट अधिकारी सचिन जाधव, मुकादम रवींद्र कांबळे, राजू माने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.