
ग्राप-पोलिस कारवाई
पोलिसांच्या कारवाईत
४९ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर, ता. १६ ः जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार चार जुगार क्लब, हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणी आणि मटका कारवाईसह अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह सर्व पोलिस ठाण्यांतून गेल्या १५ दिवसांत कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे ४९ लाख ६३ हजार १६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडाव्यात व कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस विशेष मोहीम राबवून धडक कारवाईचे आदेश दिले होते. अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या ११६ जणांवर कारवाई करून २७ लाख ८७ हजार ०३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने हत्यार बाळगल्याप्रकरणी ४५ जणांवर गुन्हे नोंदविले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी दिली.