विमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमान
विमान

विमान

sakal_logo
By

कोल्हापूर विमानसेवेचा ४ लाख प्रवाशांकडून लाभ

९ हजार विमान उड्डाणे : कोल्हापूर विमानतळाची कौतुकास्पद कामगिरी

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १६ : दिवसेंदिवस प्रगतीची उड्डाणे घेणारी कोल्हापूर विमानसेवा आता सक्षम होत आहे. गेल्या चार वर्षांत या विमानतळावरून ९ हजार विमान उड्डाणे झाली. तर ४ लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे. कोल्हापूर-मुंबईनंतर आता कोल्हापूर-बंगळूर विमानसेवाही सुरू होत असल्याने कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे.
जानेवारी १९३९ मध्ये एअर सर्व्हिसेस ऑफ इंडिया या जुहू एयरोड्रमवर आधारित खासगी विमान कंपनीने कोल्हापूर संस्थानासाठी हवाई सेवा सुरू केली. छत्रपती राजाराम महाराज यांनी या सेवेचे अधिकृत उद्‌घाटन केले होते. त्यानंतर कोल्हापूर विमानतळ अनेक अडचणींचा सामना करत दीर्घकाळ तग धरून राहिले. कधी प्रवाशांची वानवा तर कधी विमानतळाची अडचण. केंद्र सरकार, राज्य शासनाकडून विमानतळाला उभारी मिळावी यासाठी वारंवार मागणी होत राहिली. उद्योजक, व्यावसायिकांसह चित्रपटसृष्टीलाही विमानसेवेची नितांत गरज होती. विमानसेवेवरच कोल्हापूरच्या विकासाचा पाया अवलंबून आहे. त्यामुळे, राज्यात येणाऱ्या विविध सरकारानींही कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी पाठबळ दिले. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याचा अपेक्षित पाठपुरावा करत विमानसेवेत खंड पडू नये, याची काळजी घेतली. कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-मुंबई विमानसेवेनंतर आता कोल्हापूर-बंगळूर विमानसेवा सुरू होत आहे. बंगळूरहून अनेक देशांतील विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, याच विमानसेवेने कौतुकास्पद कामगिरी करत चार वर्षांत ९ हजार विमान उड्डाणे पूर्ण करत ४ लाख प्रवाशांचा सुरक्षित आणि अपेक्षित सेवा देण्यात यश मिळवले आहे. ही सेवा अधिक भक्कम करण्यासाठी शासनाकडूनही निधी मिळत आहे. सध्या विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्‍यक जमीन हस्तांतरणाचे काम सुरू आहे. याला शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला देण्यात जिल्हा प्रशासनाकडूनही चांगले नियोजन होत आहे. आतापर्यंत कोल्हापूरहून हैदराबाद येथे पर्यटनासाठी किंवा तिरुपतीला देवदर्शनासाठी सुरू केलेल्या सेवेचा प्रवाशांनी सर्वाधिक लाभ घेतला. कोल्हापूर-मुंबई विमानसेवेलाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून कोल्हापूर विमानसेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत नाईट लँडिंग आणि टेकऑपची सुविधा नसल्यामुळे रात्रीची सेवा देण्यास मर्यादा येत होती. त्यामुळे, नाईट लँडिंग सुविधेचाही मोठा फायदा होणार आहे.
.....
कोल्हापूर-बंगळूर विमानसेवेचा फायदा

कोल्हापूर-बंगळूर विमानसेवा सुरू झाल्यानंतर कोल्हापूरसह सांगली, कराड किंवा कोकणातील आणि कोल्हापूर जिल्ह्याशेजारी असणाऱ्या शहरांनाही याचा फायदा होणार आहे. १३ जानेवारीपासून ही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.