प्रशासनाचा बंद ; विक्रेत्यांचा बाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासनाचा बंद ; विक्रेत्यांचा बाजार
प्रशासनाचा बंद ; विक्रेत्यांचा बाजार

प्रशासनाचा बंद ; विक्रेत्यांचा बाजार

sakal_logo
By

gad188.jpg
69237
गडहिंग्लज : ब्याळकुड (ता. चिक्कोडी) येथून आलेल्या विक्रेत्यांकडे कांदा रोपे खरेदी करताना शेतकरी. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------
प्रशासनाचा बंद; विक्रेत्यांचा बाजार
ऐनवेळी घोषणेने संभ्रमावस्था : तुरळक गर्दी; पालेभाज्या, टोमॅटो, कोबीचे दर उतरलेलेच
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने आठवडा बाजार बंदची घोषणा केली होती. पण, विक्रेत्यापर्यंत ही माहिती न पोहोचल्याने परगावच्या विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे बाजार सुरू केला. शनिवारी (ता. १७) दुपारी बाजार बंदची घोषणा बंद झाल्याने संभ्रमावस्था राहिली. शहरातील ग्राहकांनी बंदमुळे बाहेर पडणे टाळल्याने नेहमीप्रमाणे होणारी गर्दी झाली नाही. पण, ग्रामीण भागातील ग्राहक आणि परगावच्या विक्रेत्यांमुळे बाजार भरला. मंडईत पालेभाज्या, टोमॅटो, कोबीचे दर उतरलेलेच होते.
जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने येथील आजचा आठवडा बाजार भरणार नसल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात परगावचे विक्रेते नेहमीप्रमाणे पहाटेपासूनच दाखल झाल्याने बाजार भरला. यात सीमाभागातील विक्रेत्यांची संख्या मोठी होती. केवळ शहर परिसरातील विक्रेत्यांनी दुकाने सुरवातीला लावली नव्हती. पालिका कर्मचाऱ्यांनी दहानंतर विक्रेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. केवळ उशिरा बाजार बंदची घोषणा विक्रेत्यांपर्यंत पोहोचू न शकल्याने गोंधळाची स्थिती राहिली. ग्रामीण भागात निवडणूक असताना शहरातील बाजार बंद कशाला, अशी तक्रार विक्रेत्यांची होती. सायंकाळी चारनंतर ग्राहकांची गर्दी वाढल्याचे दिसले.
भाजीमंडईत गेल्या आठभरापासून आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर उतरलेले आहेत. त्यामुळे ग्राहक खूश, तर उत्पादक नाराज अशी अवस्था आहे. सरासरी पाच रुपये पेंडीचा दर आहे. कोंथिबीर, टोमॅटो, कोबीचे भावही गडगडले आहेत. कोंथिबीर ३ ते ४ रुपये, टोमॅटो, कोबी ५ रुपये किलो असा घाऊक बाजारात दर होता. फळबाजारात महिनाभर मार्गशीर्ष महिन्यामुळे उलाढाल वाढली आहे. सफरचंद, संत्री, सीताफळ, बोरे यांची अधिक आवक आहे. सफरचंद १००-१५०, संत्री, डाळींब, मोसंबी, पेरू, बोरे ६० ते ८० रुपये किलो आहेत. केळी ४० ते ६० रुपये डझन आहेत.
---------------------
मटारची आवक
भाजीमंडईत पंधरवड्यापूर्वी मटारची आवक सुरू झाली होती. या आठवड्यात आवक वाढल्याने दर थोडे कमी झाले आहेत. ६० ते ८० रुपये किलो असा दर आहे. गाजराची आवकही वाढली असून, ४० ते ६० रुपये किलो दर होता.