हवा स्वच्छ कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवा स्वच्छ कार्यक्रम
हवा स्वच्छ कार्यक्रम

हवा स्वच्छ कार्यक्रम

sakal_logo
By

शहरातील हवा स्वच्छतेसाठी आठ कोटी
महापालिका करणार कामे; पुढील आठवड्यात समितीची बैठक

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः शहरात अतिसूक्ष्म धुलिकणांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे हवेची गुणवत्ता ढासळत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून अशा शहरांतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत महापालिकेला तब्बल आठ कोटी रूपयांचा निधी आला आहे. यामधून प्रदूषण रोखण्याची कामे निश्‍चित करण्यासाठी महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण अभ्यासक अशांचा समावेश असलेल्या समितीची पुढील आठवड्यात बैठक होत आहे.
पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या पाहणीनंतर देशातील प्रदूषित १२४ शहरांमध्ये कोल्हापूरचा समावेश झाला आहे. हवेतील प्रदूषित घटक शरीरात जात आहेत. शहर परिसरातील झाडांच्या पानावर साठलेला धुळीचा थर पाहिल्यानंतर त्यापेक्षाही किती अतिसूक्ष्म धुलिकण हवेत असू शकतील याचा अंदाज येत आहे. गेल्या काही वर्षात शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था तसेच रस्तोरस्ती साठलेल्या धुळीचा उठाव होत नाही. त्यामुळेही धुलिकणांचे प्रमाण वाढत आहे. प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पीएम २.५, पीएम १०) प्रमाण कमी करण्यासाठी मंत्रालयाने नियोजन करण्यास सांगितले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आराखडाही सादर केला होता. २०२४ पर्यंत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी निधी देण्याचे नियोजन केले आहे.
त्यानुसार गेल्या दोन वर्षात प्रदूषण रोखण्याच्या जागृती, सर्वेक्षण तसेच अनुषंगिक कार्यक्रमांसाठी ९६ लाखांचा निधी आला होता. त्यातून बिंदू चौकात व्हर्टिकल गार्डन उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर आता तब्बल आठ कोटींचा निधी आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या निधीतून महापालिकेला आता प्रकल्प राबवावे लागणार आहेत. महापालिका आयुक्त अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सदस्य सचिव असलेल्या समितीवर प्रदूषण कमी करण्याच्या कामांचे नियोजन करण्याची व अंमलबजावणी करवून घेण्याची जबाबदारी आहे. त्यामध्ये प्रदूषण करणारे घटक शोधणे, त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना याबाबत समितीला काम करावे लागणार आहे.

चौकट
आता एक पाऊल टाका पुढे...
समितीतील सदस्य असलेले पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी गेल्या दोन वर्षात आलेल्या ९६ लाख निधीचा वापर केला नसल्याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे आता आलेल्या निधीच्या नियोजनाकरिता तातडीने बैठक बोलवली आहे. त्यात चर्चा करून शहरवासीयांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्‍यक कामे सुरू करण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. जास्तीत जास्त निधीचा वापर करून हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्याची जबाबदारी आहे.

चौकट
काय आहेत अतिसूक्ष्म धुलिकण?
पीएम २.५, पीएम १० मध्ये धूळ, धातूंच्या सूक्ष्म कणांचा समावेश आहे. हे कण बांधकामांच्या जागांवर, कचरा जाळण्याने जादा वाढतात. हे कण डोळ्यांनी पाहू शकत नाही. ते हवेबरोबर श्‍वासातून शरीरात जातात.

चौकट
हे उपाय केले जाऊ शकतात
-इलेक्ट्रिक वाहनांचा वापर
-सिग्नलच्या ठिकाणी योजना
-कचरा जाळण्यासाठी निर्बंध
-फटाके वाजवण्यासाठी निर्बंध
-पारंपरिक स्मशानभूमीसाठी पर्याय
.................

कोट
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत हवेतील अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणती कामे करणे गरजेची आहेत. ती ठरवण्यासाठी समितीची बैठक बोलवली आहे.
-समीर व्याघ्रांबरे, पर्यावरण अधिकारी, महापालिका