वारणेतील पाणी पातळी पुन्हा कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणेतील पाणी पातळी पुन्हा कमी
वारणेतील पाणी पातळी पुन्हा कमी

वारणेतील पाणी पातळी पुन्हा कमी

sakal_logo
By

69511
दानोळी : येथील वारणा नदीवरील विद्युत पंपाचे फुटबॉल उघडे पडले आहेत.
---------
वारणेतील पाणी पातळी पुन्हा कमी
शेती पंपाचे फुटबॉल पडले उघडे; महिन्यात दुसऱ्यांदा परीस्थिती
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. १९ ः डिसेंबरच्या सुरुवातीला आठवडाभर वारणा नदीतील पाणी पातळी कमी झाली होती. त्यानंतर चांदोली धरणातून विसर्ग सुरू केल्यावर नदीतील पाण्याची पातळी वाढली. मात्र पंधरा दिवस झाले नाही तोपर्यंत पुन्हा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह सिंचनाच्या विद्युतपंपाचे फुटबॉल उघडे पडले आहेत. पंधरा दिवसांत दुस-यांदा नदी कोरडी पडण्याची वेळ आली आहे.
विसर्ग बंद असल्याने महिन्याच्या सुरुवातीला नदी कोरडी पडली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी आवाज उठवला. त्यानंतर चांदोली धरणातून विसर्ग सुरू केला. त्यामुळे नदीत पाण्याचा प्रवाह सुरू झाला. आठवडभर विसर्ग सुरू होता. त्यानंतर ११ डिसेंबरपर्यत ४३४ क्युसेकने विसर्ग सुरू होता. नंतर तो बंद केला.
त्यातच दानोळी बंधाऱ्याचे दरवाजे व्यवस्थित बंद केले नसल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत होती. त्यामुळेही दानोळी बंधाऱ्यातून पाणी वाहून गेल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. परिणामी नदातील सर्व विद्युतपंपाची फुटबॉल उघडे पडल्याने शेतीला पाणी देणे मुश्कील झाले आहे. नदीवरून पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी उपसा करणाऱ्या सर्वच गावांच्या योजना आहेत. त्याचे इंटक (पंपगृह) उघडे पडत आहेत. काही गावांचा पाणी पुरवठा बंद झाला असून काही गावांचा बंद होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांची नदीतील पाण्याच्या कमतरतेमुळे पंचायत झाली आहे. पाटबंधारे विभागाने विसर्गाचे नियोजन केले असते तर नदी कोरडी पडली नसती. विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
-----------
चिंचोली येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याचा पिलर पावसाळ्यात तुटून गेला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी नदीमध्ये मातीचा बांध घालण्यासाठी पाणी बंद केले होते. सध्या ४५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. लवकरच नदीतील पाण्याची पातळी वाढेल.
-मिलिंद किटवाडकर, सहायक अभियंता, कोडोली विभाग
-------
महिन्यात दुसऱ्यांदा शेतकरी व नागरिकांना नदीत पाणी कमी असण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शेतीला पाण्याची गरज आहे. अशावेळीच पाणी कमी पडून फुटबॉल उघडे पडत असतील तर शेतकऱ्यांनी करायचे काय?
-उदय राऊत, शेतकरी