
पाण्याअभावी झाडे वाळली
69530
पाण्याच्या टाकीशेजारील
हजारहून अधिक झाडे वाळली
चार दिवसांतच अवस्था; महापालिका सुवर्णमहोत्सवासाठी वृक्षारोपण
कोल्हापूर, ता. १९ ः निम्म्या शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी शेजारी असताना महापालिकेने सुवर्महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त पुईखडी जलशुद्धीकरणाजवळ लावलेली जवळपास हजारहून अधिक झाडे पाण्याअभावी वाळली आहेत. अवघ्या चार दिवसांतच ही अवस्था झाल्याने वृक्षारोपणाचा केवळ सोपस्कार झाल्याचे स्पष्ट होत आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त महापालिकेने पुईखडी येथे मुख्य रस्त्यालगतच्या जागेवर वृक्षारोपण केले. चारच दिवस झाले असताना महापालिकेच्या यंत्रणेने मात्र या वृक्षारोपणाकडे पाठ फिरवल्याचे दिसते. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी उष्माही जाणवत होता. त्या जागेवर मुरूम जास्त आहे. या वातावरणामुळे नवीन रोपे लावल्यानंतर त्याला दररोज पाणी घालायला हवे होते. पण तसे झाल्याचे दिसत नाही. रोपांच्या भोवती पाणी साठून रहावे म्हणून आळेही केलेले नाही. सर्वच रोपांची पाने वाळली आहेत.
वृक्षारोपण करत महापालिकेने सामाजिक जबाबदारी जपत असल्याचे दाखवून दिले. पण, त्या रोपांना जगवण्याची जबाबदारी मात्र घेतली नसल्याचे दिसते. वाळलेल्या झाडांचे फोटो व्हायरल होताच महापालिकेची यंत्रणा जागी झाली व पाणी मारण्यास सुरूवात केली. प्रभारी उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे यांनी वृक्षारोपणाला रात्रीत नियमित पाणी घालण्यासाठी टॅंकरचे नियोजन केल्याचे सांगितले.