दोन हजाराने मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन हजाराने मतदान
दोन हजाराने मतदान

दोन हजाराने मतदान

sakal_logo
By

मुंबई, पुण्याचे ‘मत’ दोन हजारांना
वाहतुकीसह जेवणाची सोय; लाभदायी की खर्चिक हे आज ठरणार

सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा

चंदगड, ता. १८ ः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावाबाहेर राहणारे मतदार निकालाची निश्चिती ठरवतात. कोणतीही ‘रिस्क’ घ्यायची नाही यासाठी उमेदवारांनी मुंबई, पुण्याच्या मतदारांना गावाकडे आणले. त्यांचा वाहतूक आणि जेवणाचा खर्च प्रतिमतदार किमान दोन हजारांवर गेल्याने पंचक्रोशीतील मतदारांपेक्षा हेच मतदार खिशाला चाट देणारे ठरले. या मतदारांवर लाखो रुपये खर्ची पडले. त्यामुळे उद्या (ता. 20) निकाल काय लागणार, यावर हे मतदार लाभदायी की खर्चिक ठरेल.
तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. थेट सरपंचपदाची लढत प्रतिष्ठेची असल्याने अशा उमेदवारांकडून साम, दाम, दंड, भेद या तत्त्वांचा अवलंब केला गेला. या विभागातील बहुतांश मतदार नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईला स्थायिक आहेत. त्यांची मते निकालावर परिणाम करतात. त्यामुळे त्यांना मतदानाला प्रवृत्त करण्यासाठी चढाओढ होती. स्थानिक नेते आणि उमेदवारांनी मुंबईला जाऊन त्यांची मनधरणी केली. त्यांचा ने- आण करण्याबरोबरच जेवणाचा खर्च उचलला. दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे स्थानिक आणि मुंबई, पुणेकर ग्रामस्थ अशी फूट पडली होती. त्याचे पडसाद निवडणुकीत दिसले. त्यावेळी विरोध करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यावेळी शहरवासीय ग्रामस्थांची समजूत काढताना नाकी नऊ आले. त्याचा फायदा नवख्या उमेदवारांना झाला. सत्तारुढांना विरोध म्हणून अनेक शहरवासीय मतदार मतदानासाठीआले. त्यांची वाहतुकीची व जेवणा-खाण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराने उचलली. त्यासाठी प्रतिमतदार दोन हजारांहून अधिक खर्च आला. एखाद्या गावात पन्नास मतदार आले असतील तर त्यांच्यावरच लाखाचा खर्च पडला. रिस्क नको म्हणून उमेदवारांनी खर्च पेललाही आहे. परंतु तो लाभदायी ठरणार की क्लेशदायी हे उद्या (ता. 20) निकालानंतर स्पष्ट होईल.
............

आंघोळीला पाणी गरम हवे.......
शहरातून येणाऱ्या मतदारांनी पहाटेच उमेदवाराला मोबाईलवरुन सूचना सुरु केल्या. आंघोळीला गरम पाणी हवे. नाष्टा करुनच मतदानाला जाणार. त्यानंतर जेवण करु. नातेवाईकाला भेटून लगेच परत येईन. त्यासाठी वाहनाची सोय करा, अशा सूचनांचा भडीमार सुरु झाला. मतदाराला दुखवून चालणार नाही यासाठी उमेदवाराने मनावर ताबा ठेवला. मतदानानंतर मात्र त्याची चर्चा रंगली.