
गुंतवणुकदारांना फसवणाऱ्यांच्या मालमत्तेवर टाच आणू ः फुलारी
फोटो - ६९५४९
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची सूत्रे सोमवारी मनोज लोहिया यांच्याकडून स्वीकारताना सुनील फुलारे.
गुंतवणूकदारांना फसवणाऱ्यांच्या
मालमत्तेवर टाच आणू ः फुलारे
विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः जादा व्याजदर, परदेशी सहली अशी आकर्षणे दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अशी फसवणूक करणाऱ्यांच्या व्यक्तिगत मालमत्ता जप्त करू. त्यातून गुंतवणूकदारांचे पैसे परत करू. सायबर विषयक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून यासाठी तपास यंत्रणांना सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करू, असे सूतोवाच कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक संजय फुलारे यांनी आज केले. त्यांनी श्री. मनोज लोहिया यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फुलारे म्हणाले, ‘‘गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतानाही जादा व्याज दराच्या आमिषाने गुंतवणूक केली जाते. या वेळी काही जण गुंतवणूकदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन फसवतात. यामधून कोट्यवधीची फसवणूक झाल्याचे प्रकार राज्यात सर्वत्रच समोर येत आहेत. परिक्षेत्रातील अशा गुन्ह्यांच्या तपासाकडे विशेष लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील राहू. प्रसंगी फसवणाऱ्यांची व्यक्तिगत मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करू.’’
ते म्हणाले, ‘‘सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. फसवणूक, मद्य, गुटका यांची तस्करी शेजारच्या कर्नाटक व गोव्यातून होत असल्याचे दिसून येते. यासाठी योग्य त्या उपाययोजना आखल्या जातील. पाचही जिल्ह्यातील अधीक्षकांची लवकरच बैठक घेऊन याबाबतचा आढाव घेतला जाईल. परराज्यातून महामार्गावरून होणारी तस्करी रोखण्यासाठीही प्रभावी उपाययोजना राबल्या जातील.’’
या वेळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस उपाधीक्षक (गृह) जयश्री देसाई, पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, श्रीकृष्ण कटकधोंड, राजेश गवळी, दत्तात्रय नाळे उपस्थित होते.
‘मोका’चे प्रस्ताव वाढले
जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी श्री. मनोजकुमार लोहिया यांच्या दोन वर्षांतील कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘परिक्षेत्रातील ६२ टोळ्यांना मोका लावून ४२७ गुन्हेगारांवर कारवाई केली. त्यातील ३०२ गुन्हेगार अद्यापही कारागृहात बंदिस्त आहेत. अशा प्रकारचे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले.