
कोवाड-नोटा
कागणीत फेरनिवडणुकीची मागणी
कोवाड, ता. २५ ः कागणी (ता. चंदगड) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान करून उमेदवारांना नाकारले आहे. चंदगड तालुक्यात ही पहिलीच वेळ असल्याने ‘नोटा’चा विषय चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरून हा विषय चांगलाच रंगला आहे. निवडणूक विभागाने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले असले, तरी ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण महिला गटात दोन महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते; पण मतदारांनी दोन्ही उमेदवारांना नाकारून ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान करून नाराजी व्यक्त केली; पण निवडणूक विभागाने नियमानुसार ‘नोटा’ नंतर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले. यामुळे एका गटाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने दुसऱ्या गटाने तक्रार करत फेरनिवडणुकीची मागणी केली आहे. २८५ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केल्याने दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला विजयाची संधी मिळाली आहे.