
महामार्गासाठी वृक्षतोड...सुरक्षा रामभरोसे !
GAD2110.JPG
70117
दुंडगे : तोडीनंतर वृक्षाच्या भागाचे लोडिंग भर रस्त्यातच अशा धोकादायक अवस्थेत होत असते. अशा वेळी वाहनधारकांनी सजग राहायला हवे. (संग्रहित छायाचित्र)
----------------------------------------------------
महामार्गासाठी वृक्षतोड... सुरक्षा रामभरोसे !
---
संकेश्वर-बांदा रोड : अपघाताच्या घटनेने प्रशासन जागे होणार का?
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. त्यासाठी वृक्षतोड बहुतांश उरकली असली, तरी भलीमोठी आणि अडचणीच्या ठिकाणची झाडे शिल्लक आहेत. असेच एक वडाचे झाड तोडताना फांदी अंगावर पडून एक प्रवासी गंभीर जखमी झाला. या घटनेने महामार्गासाठी वृक्षतोड करतानाची वाहतूक व प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर तरी महामार्ग प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दळणवळण आणि विकासाच्या दृष्टीने रस्ते गरजेचे असले, तरी हा विकास जनतेच्या जीवावर उठत असेल तर विचार करण्याची वेळ येते. संकेश्वर-बांदा महामार्गाचेही काहीसे असेच झाले आहे. महामार्गाचा आराखडा जनतेच्या माहितीसाठी खुला केला नसताना झाडांवर कुऱ्हाड चालवली. जनतेने तेही सहन केले. त्यानंतर महामार्गात किती जमीन जाणार, रस्त्याकडील घरे किती जाणार, संभाव्य महापुराच्या पाण्याचा फटका महामार्गावरील वाहतुकीला बसू नये म्हणून केलेल्या उपाययोजना आदी मुद्यांपासून अजूनही नागरिक, शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यासाठी विविध संघटनाही रस्त्यावर उतरत आहेत. एकीकडे शेतकरी आणि घरांच्या सुरक्षिततेची हमी महामार्ग प्राधिकरणाने दिली नसतानाच वृक्षतोड करताना कोणत्याच सुरक्षेची उपाययोजना न केल्याने झाडाची फांदी आता एकाच्या जिवावर उठली. हा प्रकार जनतेच्या संतापात भर टाकणारा ठरला आहे.
महामार्गाच्या अंतरातील झाडे तोडताना ठेकेदाराकडून वाहतूक थांबवली जाते. परंतु, किती सुरक्षेच्या अंतरावर ही वाहतूक थांबवावी, याचा अभ्यासच ठेकेदाराकडून झाल्याचे दिसत नाही. झाड रस्त्यावर पाडले जाते, त्याचवेळी वाहतूक थांबवली जाते. तेही अगदी २० ते २५ फुटांपर्यंत वाहने थांबलेली असतात. कारण ठेकेदाराकडून त्यासाठी सुरक्षेच्या ठराविक अंतरावर दोन्ही बाजूंनी कुठेही बॅरिकेटिंग किंवा अडथळा लावला जात नाही. यामुळे वाहने झाडतोडीच्या ठिकाणी अगदी बुडक्याला येऊन थांबतात. यातूनच दुंडगेजवळची घटना घडल्याची चर्चा आहे. मुळात ठेकेदाराकडून किती अंतरावर वाहने थांबवावीत, याचे नियोजन गरजेचे होते. परंतु, अख्ख्या वृक्षतोडीच्या कालावधीत हे नियोजन कुठेच दिसले नाही. प्रशासनालाही याचे काही देणे-घेणे नसल्याचेच चित्र आहे. हा गलथान प्रकारच आता एकाच्या जिवावर उठल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये आहे. यामुळे आता तरी प्रशासनाने जागे व्हावे, अशी अपेक्षा जनतेची आहे.
-----------------
चौकट
* वाहतुकीचे ब्रिदवाक्य लक्षात ठेवा
वृक्षतोड अगर रस्त्याचे कोणतेही काम सुरू असताना धोकादायक परिस्थितीतही वाहनधारक सुसाट असतात. रस्त्यावरचे काम दिसत असूनही असे प्रकार वारंवार पाहायला मिळतात. काही सूज्ञ नागरिक सजगतेने काहीवेळ थांबतातही. मात्र, काही वाहनधारकांच्या घाईच्या नादामुळेही अशा घटना घडतात. यामुळे ‘अति घाई... संकटात नेई...’ हे वाहतुकीचे ब्रिद प्रवाशांनी नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.