फिटनेस- कोरोनानंतर सायकलींकडेही वाढला कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिटनेस- कोरोनानंतर सायकलींकडेही वाढला कल
फिटनेस- कोरोनानंतर सायकलींकडेही वाढला कल

फिटनेस- कोरोनानंतर सायकलींकडेही वाढला कल

sakal_logo
By

फिटनेससाठी सायकलींकडे वाढतोय कल
---
तरुणाईसह ज्येष्ठांचाही सहभाग, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः कोरोनाने डोके वर काढले आहे. त्याचवेळी फिटनेससाठी म्हणून सायकलींकडे पुन्हा कल वाढू लागला. शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या सायकलींची उलाढाल मोठी असली तरी त्या तुलनेत आता अत्याधुनिक गिअर सायकलींचीही उलाढाल वाढली आहे. या सायकली १३ हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत आहेत. दरम्यान, हिवाळ्यामुळे पदभ्रमंती, बाईक रायडिंग, सायकलिंग मोहिमांचीही संख्या वाढली. रोज शक्य नसले तरी आठवड्यातून किमान एक दिवस सायकलिंगचा ट्रेंडही वाढत आहे.

- दीड वर्षात २७५ सभासद
कोल्हापुरात दोन ते तीन सायकल क्लब पूर्वीही होते. पण, दीड वर्षापूर्वी कोल्हापूर सायकलिंग क्लब नावाने आणखी एक क्लब स्थापन झाला असून, त्यात विविध व्यावसायिक, शिक्षकांसह सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. सभासद संख्या २७५ वर पोचली असून, शहरातील वेगवेगळ्या भागांत ते रोज सायकलिंग करतात. कळंबा ते इस्पुर्ली मार्गावर किमान २५ जण असतात आणि रोज ३५ किलोमीटर सायकलिंग ते करतात. आठवड्यातून एक दिवस सायकलिंग करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, असे क्लबचे अध्यक्ष अनिल शिंदे सांगतात.

- मोहिमांचीही संख्या वाढली
वर्षाला सायकलवरून किमान काही ठिकाणांना भेट द्यायची आणि त्यासाठी तीन-चार जणांनी मिळून मोहीम आखायची, ही संकल्पनाही रुजली आहे. त्यातही कोल्हापूर ते कन्याकुमारी ही मोहीम सर्वाधिक लोकप्रिय आहे. कालच (ता. २०) फुलेवाडी येथील अनिल कुंभार, सुरेंद्र अणवेकर, सचिन पाटील याच मोहिमेसाठी रवाना झाले. रोज १२५ ते १५० किलोमीटरचा प्रवास करीत ते ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देणार आहेत आणि १ जानेवारीला रामेश्वर-मदुराई येथे नव्या वर्षाला प्रारंभ करणार आहेत. ही मोहीम पूर्ण झाल्यावर ४ जानेवारीला रेल्वेने कोल्हापूरकडे त्यांचा प्रवास सुरू होईल.
...........
सायकलिंगचे फायदे
- स्वस्त, उत्तम व्यायाम
- तणावमुक्तीबरोबरच स्टॅमिनाही वाढतो
- वजन कमी करणे, भूक लागण्यासाठीही उपयुक्त
- मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरुग्णांसाठीही फायदेशीर
- शालेय विद्यार्थी, तरुणाईसाठी स्नायू व हाडांच्या बळकटीसाठी अत्यंत उपयुक्त
.................
कोट
फिटनेससाठी म्हणून सायकलिंगकडे ओढा वाढत आहे. कोल्हापुरात पाच लाखांपर्यंतच्या सायकली उपलब्ध आहेत आणि त्यांना मागणीही चांगली आहे. शालेय मुलांसाठीच्या सायकलींची उलाढालही मोठी आहे.
- अनुप परमाळे, परमाळे सायकल्स

कोट
सकाळी राजाराम तलावावर पोहायला जाण्यापासून ते रोजच्या सर्व कामांसाठी सायकलच वापरतो. कमर्शियल बॅंकेतील नोकरीही सायकलवरूनच केली. आता ६८ वर्षांचा आहे आणि सायकलिंगमुळेच आजही ठणठणीत आहे.
- मानसिंग जाधव, ज्येष्ठ नागरिक