
ग्रामपंचायत झाली आता जिल्हा परिषद
जिल्हा परिषद ... लोगो
...
ग्रामपंचायत झाली आता लक्ष जिल्हा परिषदेवर
वातावरणाचा फायदा उठवण्याची गटांची तयारी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्यांनी ज्यांना, त्यांना अपेक्षित मैदान मारले आहे. त्यामुळे या वातावरणाचा फायदा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत होईल, अशी सर्वच राजकीय पक्षांना खात्री वाटत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निकालानंतर अनेकांनी आता जिल्हा परिषद, पंचायत समिती लक्ष असल्याचे स्टेटस् लावत तयारीला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. तर उर्वरित ग्रामपंचायतींनाही आचारसंहिता लागू असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले. नेत्यांनी जाहीर प्रचार आणि राजकीय सभा घेतल्या नसल्या तरी, पडद्यामागून त्यांनी अनेक ग्रामपंचायतींचे राजकारण फिरवले. सोयीच्या आघाड्या केल्या. परस्पर कट्टर विरोधी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनीही स्थानिक पातळीवर आघाड्या करत गावातील सत्तेत प्रवेश मिळवला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढणाऱ्यांसाठी ग्रामपंचायत निवडणूक ही लिटमस टेस्ट होती. यात मातब्बर सदस्यांनी आपले गड राखले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ते शड्डू ठोकून मैदानात येणार, यात तिळमात्रही शंका नाही.
ग्रामपंचायत रणधुमाळीमुळे तयार झालेले वातावरण, विजयी गुलाल, सोयीच्या आघाड्या यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लवकर घेतल्या जाव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेही मागील वर्षभरापासून या निवडणुका झालेल्या नाहीत. सर्वच संस्थांत प्रशासकराज आहे. महापालिकेत तर दोन वर्षे प्रशासक आहेत. त्यामुळे आता अधिवेशनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. यासाठी इच्छुकांनी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.