
सतेज पाटील- दाजीपूर अभयारण्य
दाजीपूर अभयारण्याचा
दर्जा वाढविण्यासाठी कार्यवाही सुरू
आमदार सतेज पाटील ः पुनर्वसनासाठी निधीची विधान परिषदेत मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः राधानगरी तालुक्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा दर्जा वाढविण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. वन्यजीव संपदेला अभय मिळवण्यासाठी आणखी एका अभयारण्याची गरज असून वन्यजीवांचा विकास करणे, तसेच ग्रामस्थांचा हस्तक्षेप आणि अतिक्रमण यासाठी नियमाप्रमाणे तेथील मानवी वस्त्या, गावे आणि ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत दाजीपूर अभयारण्याचा दर्जा वाढविण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.
आमदार पाटील यांच्या मागणीवर बोलताना वनमंत्री मुनगंटीवार यांनी राधानगरी अभयारण्यातील १२ महसुली गावांचे पुनर्वसन प्रस्तावित असून त्यापैकी न्यू करंजे व एजिवडे या दोन गावांची पुनर्वसन प्रक्रिया सद्य:स्थितीत कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी आतापर्यंत ४० कोटी २४ लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती दिली.