
आजरा ः रोहनचा चटका लावणार मृत्यू
70162रोहन देसाई
...........
रोहनची एक्झिट चटका लावणारी
खेडेजवळ अपघात ः वाटंगीसह आजऱ्यात हळहळ
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २१ ः सतत हसरा चेहरा. लाघवी व्यक्तिमत्त्व, कामाचा कितीही व्याप असू देत सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी, अशा तरुण उद्योजकाची आज अचानक झालेली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली. रोहन सदानंद देसाई (मूळगाव वाटंगी, सध्या रा. आजरा) असे त्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी आजरा-गडहिंग्लज मार्गावर खेडेजवळ झालेल्या एका अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्याने आज अखेरचा श्वास घेतला.
रोहन देसाई हा उच्चशिक्षित युवक दहा वर्षांपूर्वी बंगळूर येथील चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावी परतला. त्याने येथेच उद्योग सुरू करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे ठऱवले. करंबळी (ता. गडहिंग्लज) येथे त्याने ब्रिकेट्स तयार करण्याचा कारखाना घातला आहे. डोळ्यांतील उद्योगाचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे तो सतत कार्यमग्न असे. सोमवार (ता.१९) तो कारखान्याचे काम आटोपून आजऱ्याकडे घरी परतत होता. आजरा- गडहिंग्लज मार्गावर खेडेनजीक त्याच्या दुचाकीला चारचाकीने धडक देऊन उडवले. दुचाकीसह तो रस्त्याबाहेर फेकला गेला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली होती. गेले तीन दिवस तो मृत्यूशी झुंजत होता. आज सकाळी त्याची झुंज अपयशी ठरली.