
तरुणाने ३ तोळे दागिने प्रामाणिकपणे परत केले.
70181
...
तरुणाने प्रामाणिकपणे दागिने केले परत
कोल्हापूर ः एकीकडे समाजात आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असताना संदीप पाटील या तरुणाने त्याला बागल चौकात सापडलेले तीन तोळ्यांचे दागिने पोलिसांना परत केले. विलास कांबळे या शिक्षकाचे हे दागिने होते. कांबळे हे येवती (ता. करवीर) येथील आहेत. गुरुवारी (ता. २२) दुपारी ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत कामासाठी आले होते. घरी जात असताना बागल चौकात त्यांच्याकडील तीन तोळ्यांचे दागिने रस्त्यात पडले. शोधाशोध करूनही दागिने न मिळाल्याने त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. दरम्यान, जवाहरनगरमधील संदीप पाटील हा तरुण बागल चौक परिसरातून जात होता. त्या वेळी त्यांना रस्त्यात दागिन्यांची डबी आढळून आली. त्यांनी हे दागिने शाहूपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचारी जुबीन शेख यांच्याकडे सुपूर्द केले. दरम्यान, विलास कांबळे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन संबंधितांचे आभार मानले. संदीप पाटील या तरुणाच्या प्रामाणिकपणाबद्दल शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी त्याचा सन्मान केला.