उसनवारीवर शिजतोय पोषण आहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उसनवारीवर शिजतोय पोषण आहार
उसनवारीवर शिजतोय पोषण आहार

उसनवारीवर शिजतोय पोषण आहार

sakal_logo
By

उसनवारीवर शिजतोय पोषण आहार
---
धान्यादी साहित्याचा पुरवठा रखडला; मागणीला विलंब झाल्याचा परिणाम
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : शासनाकडून पदार्थ निश्चितीचे पत्र वेळेत आले नाही, पत्र नाही म्हणून शाळांकडून मागणीला विलंब झाला. मागणीला विलंब झाल्याने धान्यादी साहित्याचा पुरवठा रखडला. प्रशासकीय स्तरावरील या साऱ्या चुका असताना शिक्षा मात्र शालेय पोषण आहार पुरवठादारांना भोगावी लागत आहे. महिनाभरापासून त्यांच्यावर उसनवारीतून पोषण आहार शिजवण्याची वेळ आली. पोषण आहार साहित्याचा तातडीने पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
शासनाच्या प्राथमिक शाळा व अनुदानित माध्यमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवला जातो. शाळांच्या पातळीवर बचत गटांना आहार शिजवण्याचा ठेका दिलेला आहे. त्यांना शासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून धान्यादी साहित्य (तांदूळ, कडधान्य, मसाले) पुरविले जाते. दरमहा किंवा दोन महिन्यांतून एकदा त्याचा पुरवठा केला जातो.
मात्र, डिसेंबर महिना संपत आला तरी धान्यादी साहित्याचा पुरवठाच झालेला नाही. पण, साहित्य नाही म्हणून विद्यार्थ्यांचा पोषण आहार बंद करता येत नाही. परिणामी, पुरवठादारांना उसनवारी करून पोषण आहार शिजवावा लागत आहे. शासनाकडून पोषण आहाराचे पदार्थ ठरविण्यास विलंब झाला. त्यामुळे साहित्य निश्चितीचे पत्र उशिरा आले. साहजिकच, शाळांकडून मागणी नोंदविण्यास विलंब झाला आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून अद्याप धान्यादी साहित्याचा पुरवठा झालेला नाही. मुळात पोषण आहार शिजवण्यासाठी शासनाकडून दिले जाणारे इंधन बिल वेळेत मिळत नाही. त्यात साहित्यासाठी उसनवारी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल.
-------------
* पोषण मूल्यांचा असमतोल...
विद्यार्थ्यांना सर्व पोषणमूल्य मिळावीत, या हेतूने आहारात बदल केला जातो. तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, मूग ही कडधान्ये आलटून-पालटून देण्याची तरतूद आहे. मात्र, या साऱ्या गोष्टी कागदावरच आहेत. जूनपासून तीन महिने तूरडाळ व चवळी तर सप्टेंबरपासून मूगडाळ व वाटाणे दिले आहेत. तीन महिन्यांनंतर तरी बदल होईल, अशी अपेक्षा होती. पण, डिसेंबर व जानेवारीसाठी पुन्हा मूगडाळ व वाटाण्याचीच तरतूद केली. त्यामुळे पोषणमूल्यांचा असमतोलपणा दिसून येत आहे.
-------------
* मोठ्या शाळांत अडचण...
धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यास उशीर झाल्यास लहान शाळांत फारसा फरक पडत नाही. पण, अधिक पटसंख्या असणाऱ्या मोठ्या शाळांत अडचणींना सामोरे जावे लागते. पटसंख्येच्या प्रमाणात धान्यादी साहित्यही अधिक लागते. इतक्या मोठ्या प्रमाणात उसनवारी कशी करायची, हा प्रश्न आहे.