राजकीय पक्ष जमीनीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय पक्ष जमीनीवर
राजकीय पक्ष जमीनीवर

राजकीय पक्ष जमीनीवर

sakal_logo
By

राजकीय पक्षांना आणले जमिनीवर
---
ग्रामपंचायत निवडणूक; गडहिंग्लजला आघाड्यांवर शिक्कामोर्तबसाठी नेत्यांत रस्सीखेच
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी सर्वच राजकीय पक्षांना जमिनीवर आणल्याचे चित्र आहे. कोणत्याही एका पक्षाला झुकते माप न देता स्थानिक समविचारी आघाडीवर जनतेने विश्‍वास दर्शविला. आता समविचारी आघाड्यांवर राजकीय पक्षाचा शिक्का मारण्यासाठी नेते धडपडत आहेत. अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात ठेवून पुढच्या निवडणुका सोपे करण्याचा नेत्यांचा प्रयत्न यातून होत आहे.
गावगाड्याच्या कारभारात काही गावांतील प्रस्थापितांची उचलबांगडी करण्यात मतदारांनी मागे-पुढे पाहिले नाही. गोडसाखर निवडणुकीच्या धर्तीवर तयार झालेल्या काही समविचारी आघाड्यांना मतदारांनी स्वीकारले. बालेकिल्ला असलेल्या ‘राष्ट्रवादी’लाही मतदारांनी काही ठिकाणी रोखले. राज्यात सत्ता असल्याने बहुतांश गावे आपल्या ताब्यात मिळतील, अशी भारतीय जनता पक्षाची अपेक्षाही फोल ठरविली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना फुटीमुळे हक्काची मते गमवावी लागली. काँग्रेसच्या जाजमाचे यापूर्वीच चार तुकडे झाल्याने या पक्षाच्या फारशा काही आशा उरलेल्या नाहीत. मात्र, पक्षाचे गटप्रमुख आपल्या अस्तित्वासाठी धडपडले. जनता दलाची ग्रामीण भागातील ताकदीची मर्यादाही स्पष्ट झाली आहे.
निवडणुकीत गृहीत न धरण्याचा इशारा देण्यासह नेत्यांना आत्मचिंतनाचाच सल्ला मतदारांनी मतदान यंत्राद्वारे दिल्याचे दिसते. ‘हा माझा-तो माझा’ अशी १०० टक्के खात्री देता येण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. बहुतांश गावात आघाड्यांचे राजकारण यशस्वी ठरले. यामुळे या आघाड्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली. सरपंच, सदस्यपदावर दावा होत आहे. आता नूतन सरपंच, सदस्यांचा सत्कार करून त्यांच्यावर पक्षाचा शिक्का मारण्याचा प्रयत्नही नेत्याकडून होत आहे. या माध्यमातून भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेरीज करण्यात नेत्यांत रस्सीखेच आहे.

चौकट...
इच्छुकांच्या जुळण्या...
नेसरी, गिजवणे, भडगाव या तीन जिल्हा परिषद मतदारसंघात बहुतांश गावांच्या निवडणुका झाल्या. गटातील इच्छुकांनी गावागावांतील निवडणुकीत लक्ष घालून आपल्या पक्षाचे सदस्य अधिकाधिक कसे निवडून येतील, याकडे लक्ष दिले. निकालातून काही इच्छुकांना खडतर, तर काही इच्छुकांना सोपा मार्ग तयार झाला आहे.