घंटागाड्यांबाबत तक्रारींसाठी नोंदवही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घंटागाड्यांबाबत तक्रारींसाठी नोंदवही
घंटागाड्यांबाबत तक्रारींसाठी नोंदवही

घंटागाड्यांबाबत तक्रारींसाठी नोंदवही

sakal_logo
By

इचलकरंजी महापालिका टाकणे
------------------

घंटागाड्यांबाबत तक्रारींसाठी नोंदवही
प्रशासक सुधाकर देशमुख; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज

इचलकरंजी, ता. २२ ः घरोघरी जाऊन कचरा संकलित करणाऱ्या घंटागाड्यांबाबत तक्रारीसाठी मुख्यालयासह चार विभागीय कार्यालयांत तक्रार नोंदवही ठेवली जाईल. तक्रारींची शहानिशा केल्यावर संबंधित मक्तेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांनी दिले.
महापालिका सभागृहातील बैठकीत त्यांनी कामकाजाच्या अनुषंगाने पत्रकारांशी वार्तालाप केला. रस्त्यांचे पॅचवर्क गुणवत्तापूर्वक होईल, याकडे कटाक्षाने लक्ष देऊ, अशी हमी दिली. कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातील. शासकीय सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे प्रशासक देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असला तरी प्राणी क्लेश कायद्यांतर्गत त्यांना ठार करता येत नाही. त्यांची संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू केली आहे. टाकाऊ मांसाहारी पदार्थ उघड्यावर टाकल्यास संबंधित खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई होईल.
आकृतिबंध मंजुरीनंतर ७५ बेडचे रुग्णालय सुरू होईल. दूधगंगा योजनेच्या कामाच्या निविदेला २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत निविदा भरल्या जातील. कृष्णा योजनेची उर्वरित जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वाढीव भागासाठी भुयारी गटार योजना राबविणार असून, दोन अत्याधुनिक एसटीपी प्रकल्पांचाही समावेश असेल. २२५ कोटींचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.
रस्ताकामाच्या गुणवत्तेबाबत प्रशासन सतर्क राहील. डांबरीकरणाऐवजी काँक्रिटचे रस्ते टिकाऊ असतात. पण, ते खर्चिक असतात. पॅचवर्क गुणवत्तापूर्वक होण्यासाठी बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. आवश्यकता वाटल्यास स्वतः जागेवर जाऊन कामाची पाहणी करू. आर्थिक तरतूद नसल्याने ४०० कंत्राटी कामगार भरतीची निविदा रद्द केल्याचे प्रशासक देशमुख यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त प्रदीप ठेंगल उपस्थित होते.
-------
दिशादर्शक फलक लावणार
तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या निधीतून शहरात दिशादर्शक फलक बसविले आहेत. काही फलक खराब झाले. आवश्यकतेनुसार आणखी दिशादर्शक फलक बसविण्यात येतील, असे देशमुख यांनी सांगितले.