घंटागाड्यांबाबत तक्रारींसाठी नोंदवही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घंटागाड्यांबाबत तक्रारींसाठी नोंदवही
घंटागाड्यांबाबत तक्रारींसाठी नोंदवही

घंटागाड्यांबाबत तक्रारींसाठी नोंदवही

sakal_logo
By

इचलकरंजी महापालिका टाकणे
------------------

घंटागाड्यांबाबत तक्रारींसाठी नोंदवही
---
प्रशासक सुधाकर देशमुख; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज
इचलकरंजी, ता. २२ ः घरोघरी जाऊन कचरा संकलित करणाऱ्या घंटागाड्यांबाबत तक्रार करण्यासाठी मुख्यालयासह चार विभागीय कार्यालयात तक्रार नोंदवही ठेवली जाईल. तक्रारींची शहानिशा केल्यावर संबंधित मक्तेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांनी दिले.
महापालिका सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने पत्रकारांशी वार्तालाप केला. रस्त्यांचे पॅचवर्क गुणवत्तापूर्वक होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल, अशी हमी त्यांनी दिली. कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेऊन महापालिका पातळीवर सर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे प्रशासक देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, की भटक्या कुत्र्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असला तरी प्राणी क्लेष कायद्यांतर्गत त्यांना ठार करता येत नाही. पण, त्यांची संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांच्या संख्येवर निश्चित नियंत्रण येईल. टाकाऊ मांसाहारी पदार्थ उघड्यावर टाकल्यास संबंधित खाद्यपदार्थ विकत असलेल्या फेरीवाल्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
आकृतिबंध मंजुरीनंतर ७५ बेडचे रुग्णालय सुरू करण्यात येईल. दूधगंगा योजनेच्या कामाच्या निविदेला २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत नक्कीच निविदा भरल्या जातील. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कृष्णा योजनेची उर्वरित जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शहराच्या वाढीव भागासाठी भुयारी गटार योजना राबविण्यात येणार असून, यात दोन अत्याधुनिक एसटीपी प्रकल्पांचाही समावेश असेल. सुमारे २२५ कोटींचा हा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. नजीकच्या काळात हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.
रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रशासन सतर्क राहणार आहे. डांबरीकरणाऐवजी काँक्रिटचे रस्ते टिकाऊ असतात. पण, ते खर्चिक असतात. मात्र, सध्या सुरू असलेले पॅचवर्क गुणवत्तापूर्वक होण्यासाठी बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. आवश्यकता वाटल्यास आपण स्वतः जाऊन जागेवर या कामाची पाहणी करणार आहोत. अतिक्रमणचा प्रश्न गंभीर आहे. पण, आपल्या अपरोक्ष काही प्रकार घडतात. आपल्याकडे अपेक्षित मनुष्यबळ नाही. त्यामुळे मर्यादा पडत आहेत. आर्थिक तरतूद नसल्याने सुमारे ४०० कंत्राटी कामगार भरतीची निविदा रद्द करण्यात आल्याचे प्रशासक देशमुख यांनी सांगितले. या वेळी उपायुक्त प्रदीप ठेंगल उपस्थित होते.
-------
दिशादर्शक फलक लावणार
तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या निधीतून शहरात विविध ठिकाणी दिशादर्शक फलक बसविले आहेत. यातील काही फलक खराब झाले. आवश्यकतेनुसार आणखी काही ठिकाणी दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत, असे प्रशासक देशमुख यांनी या वेळी सांगितले.