बाजार समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती
बाजार समिती

बाजार समिती

sakal_logo
By

लोगो
....

बाजार समितीची निवडणूक
३ जानेवारीपर्यंत लांबणीवर

निवडणूक प्राधिकरण ः नव्या ग्रामपंचायत सदस्यांचा यादीत समावेश
सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. २२ ः ग्रामपंचायत निवडणुकीमुळे उद्यापर्यंत (ता. २३) पुढे ढकलण्यात आलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा ३ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. राज्य सहकार प्राधिकरणाने यासंदर्भातील आदेश आज काढले. ३ जानेवारी रोजी उच्च न्यायालयात या निवडणुकीबाबत अंतिम सुनावणी आहे, या याचिकेवरील निकालावर निवडणुकीच्या तारखा अवलंबून आहेत.
दरम्यान, २० डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व सदस्यांची नांवे अंतिम मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत. कोल्हापूर कृषी बाजार उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र सहा पूर्ण व कागल अर्धा अशा साडेसहा तालुक्यात आहे. या तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे समाविष्ट होण्याचा मार्गही प्राधिकरणाच्या या नव्या आदेशाने मोकळा झाला आहे.
कोल्हापूरसह राज्यातील अन्य बाजार समितींसाठी १ सप्टेंबर २०२२ हा अर्हता दिनांक गृहीत धरून मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. त्यानुसार अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध झाली आहे; पण या अर्हता दिनांकानंतर राज्यातील ९ हजार ५२५ ग्रामपंचायती व ३९९ विकास सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. बाजार समितीला कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती सदस्य व विकास सोसायटीचे संचालक मतदार असतात; पण अर्हता दिनांकानंतर या निवडणुका जाहीर झाल्याने नव्या सदस्य व संचालकांना मतदार यादीत समाविष्ट करता येणार नव्हते. त्यामुळे काही लोकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून अर्हता दिनांकांवर आक्षेप घेतला होता.
बाजार समितीच्या अधिनियमातही नव्या सदस्यांसह संचालकांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याची तरतूद नव्याने करण्यात आली आहे. तथापि, त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. तत्पूर्वीच प्राधिकरणाने ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण पुढे करत या निवडणुकांना २३ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. ही मुदत उद्या संपत असतानाच आज प्राधिकरणाने पुन्हा ३ जानेवारीपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचे नव्याने आदेश काढले.
..............

जिल्ह्यात ४७४ ग्रामपंचायतीचे निकाल
जिल्ह्यात २० डिसेंबर रोजी ४७४ गावांतील ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. कोल्हापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी व गगनबावडा पूर्ण तर कागल अर्धा असे साडेसहा तालुक्यांचे आहेत. या साडेसहा तालुक्यांत झालेल्या ग्रामपंचायतीच्या नव्या सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. उर्वरित तालुक्यातील नूतन सदस्यांना त्या-त्या तालुक्यात असलेल्या बाजार समितीच्या मतदार यादीत नावे समाविष्ट केली जाणार आहेत.
...........