
प्रभाकर आरडे यांचा रविवारी सत्कार
70363
अमृत महोत्सवानिमित्त उद्या
प्रभाकर आरडे यांचा सत्कार
कोल्हापूर, ता. २३ ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते तथा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांचा रविवारी (ता. २५) अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार सोहळा होईल. यावेळी त्यांचे ‘भारताच्या शिक्षण चळवळी पुढील आव्हाने व शिक्षक कार्यकर्त्यांची भूमिका’ याविषयी मार्गदर्शनही होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जरगनगर येथील श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता सोहळा होईल. यावेळी जिल्ह्यातील शिक्षण चळवळीशी संबंधित असलेल्या, त्याचबरोबर विविध कामगार-कर्मचारी संघटनांची संबंध असलेल्या पदाधिकारी व शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समिती व प्रभाकर आरडे अमृत महोत्सव गौरव समितीने केले आहे. शिक्षक बँकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील, समन्वय समितीचे ज्योतीराम पाटील, शिक्षक समितीच्या महिला राज्याध्यक्षा वर्षा केनवडे, कृष्णात कारंडे, उमेश देसाई, संजय पाटील, संजय कडगावे, बँकेचे संचालक सुरेश कोळी उपस्थित होते.