
माजी सदस्य सत्कार
फोटो- 70370
महापालिकेने जोडले तुटलेले दुवे
---
हृद्य सत्काराने माजी पदाधिकारी, सदस्य भारावले
कोल्हापूर, ता. २२ ः ज्यांनी कारभाराची शिस्त घालून दिली, शहरासाठी नवनवीन निर्णय घेतले, त्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अगदी मुकादमासारखे राबले, अशा रीतीने महापालिका घडविणाऱ्या पहिल्या सभागृहातील तसेच नगरपालिकेच्या मावळत्या सभागृहातील माजी पदाधिकारी, सदस्यांचा सन्मान करीत महापालिकेने आज जुने तुटलेले दुवे नव्याने जोडले. निमित्त होते, महापालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनाचे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ज्या पदाधिकारी, सदस्यांच्या कालावधीत महापालिकेकडे सुपूर्द केले, त्याच नाट्यगृहात त्यांच्या कर्तृत्वाचा महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर यांनी शाल, पुस्तक व रोप देऊन गौरव केला. यामुळे भारावलेल्या या ‘माजीं’नी प्रशासनाने दिलेल्या आगळ्या भेटीबाबत मनापासून आभार मानले.
या वेळी साऱ्या सत्कारमूर्तींतर्फे काही प्रातिनिधीक मनोगते व्यक्त करण्यात आली. यात काही दिवगंतांचीही आठवण निघाली. ॲड. महादेवराव आडगुळे यांनी हद्दवाढीअभावी शहराचा विकास खुंटला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी महापौर असताना जकात रद्द करण्याला विरोध केला व काही काळ तो निर्णय पुढे ढकलला. पण, त्यानंतर जकात गेली, एलबीटी गेली व आता जीएसटी आला असून, विकासासाठी नगण्य वाटा मिळत असल्याची खंत व्यक्त केली. त्या काळी आयुक्त महापौरांच्या कार्यालयात चर्चेसाठी येत. पण, सध्या महापौरांना आयुक्तांच्या कार्यालयात जावे लागत असल्याचे सूचकपणे सांगितले.
मोहन हवालदार म्हणाले, ‘‘जुनं ते सोनं असतं. पण, ते ओळखायला कसबी सोनारही लागतो. प्रशासकांनी आमच्यासारख्या जुन्यांचा सत्कार करून ते दाखवून दिले. आमच्या पहिल्या सभागृहाने केलेल्या कामामुळे शासनाने दोन वर्षे मुदतवाढ दिलेले एकमेव सभागृह होते. त्या काळी अंदाजपत्रकीय चर्चा सलग आठ-आठ तास चालून दुसऱ्या दिवशीही चालायच्या. सध्या महापालिकेत असलेले कारभारी युग संपून पुन्हा जबाबदारीचे युग आले पाहिजे.’’ अशोकराव भंडारे यांनी हा सन्मानाचा दिवस आम्ही सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवू. आम्ही काम करीत असताना कधी वादविवाद, आरोप-प्रत्यारोप केले नाहीत. कर्मचाऱ्यांचा अपमान केला नाही. त्यामुळेच आज आम्ही महापालिकेत आलो तर आदराने विचारपूस केली जाते, असे सांगितले.
प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, ‘‘ज्यांनी महापालिका घडवली, त्यांचा आदर करण्यासाठी हा सन्मान केला. या साऱ्या माजी पदाधिकारी, सदस्यांमुळेच सध्याच्या महापालिकेचे अस्तित्व निर्माण झाले आहे. आजही ते या सोहळ्यासाठी वेळेत उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्याकडून शिस्तीचा धडा मिळाला. या साऱ्यांकडे अनुभवाची मोठी शिदोरी आहे, त्यांनी मार्गदर्शन करावे.’’ अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी प्रास्ताविक केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
यांचा झाला गौरव
१९७२ मधील पालिकेच्या मावळत्या सभागृहाचे सदस्य असलेले प्रल्हाद चव्हाण, तर १९७८ मधील महापालिकेच्या पहिल्या सभागृहातील चंद्रकांत साळोखे, शंकरराव वाघ, उमेश चोरगे, आनंदराव पायमल, अशोक जामसांडेकर, आर. के. पोवार, ॲड. महादेवराव आडगुळे, अशोक भंडारे, गौतम जाधव, मोहन हवालदार यांचा सन्मान करण्यात आला.